सलमान खानचा 15 वर्ष जुना नोकर चोरी प्रकरणी अटकेत

अभिनेता सलमान खानच्या गोराईतील बंगल्यावर केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या नोकराला 29 वर्ष जुन्या चोरी आणि मारहाणी प्रकरणी अटक झाली

सलमान खानचा 15 वर्ष जुना नोकर चोरी प्रकरणी अटकेत

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या बंगल्यावरुन ‘वाँटेड’ गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. सलमानच्या गोराईतील बंगल्याचा केअर टेकर म्हणून काम करणाऱ्या सिद्धेश्वर राणा याला जबरी चोरी आणि मारहाणीच्या गुन्ह्यात बेड्या (Salman Khan Bungalow Care Taker Arrested) ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे राणा सलमानकडे गेल्या 15 ते 20 वर्षांपासून काम करत होता.

मुंबईच्या गुन्हे शाखा विभागाने आरोपी सिद्धेश्वर राणा याला तीन दिवसांपूर्वी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. 29 वर्ष जुन्या चोरी आणि मारहाणीच्या प्रकरणात राणा फरार होता. राणाची अटक (Salman Khan Bungalow Care Taker Arrested) ही मुंबई गुन्हे शाखेने उघडलेल्या फरार आरोपींना जेरबंद करण्याच्या मोहिमेचा एक भाग आहे.

1990 साली सिद्धेश्वर राणा आणि त्याच्या दोघा साथीदारांना चोरी प्रकरणात अटक झाली होती. कलम 452 (अतिक्रमण/ट्रेसपासिंग), कलम 394 (दरोडा टाकताना जाणुनबुजून दुखापत करणे) आणि कलम 397 (जबरी चोरी) अंतर्गत राणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेनंतर राणासह तिन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. मात्र राणा जामिनावर सुटल्यानंतर पसार झाला. त्याने कोर्टाच्या सुनावणीलाही कधीच हजेरी लावली नाही. त्यामुळे कोर्टाला त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

सलमान खानच्या ‘बिग बॉस 13’मुळे अश्लीलतेचा प्रसार, शो बंद करण्यासाठी केंद्राकडे मागणी

राणाला जेरबंद करण्यासाठी त्यावेळी गुन्हे शाखेचं युनिट 4 त्याने दिलेल्या पत्त्यावर गेलं, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

नव्याने सुरु झालेल्या तपासात राणा गोराई गावात गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. राणाच्या मागावर गेलेले पोलिस तो केअर टेकर म्हणून काम करत असलेल्या बंगल्यावर पोहचले. हा बंगला अभिनेता सलमान खानच्या नावे असल्याचं समजताच पोलिसही अवाक झाले.

प्राथमिक चौकशीनंतर सिद्धेश्वर राणा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि किल्ला कोर्टात हजर केलं. परंतु कोर्टाने त्याला पुन्हा जामीन मंजूर केला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI