Sanjay Raut : अजित पवारांना इतकी घाई कशाची? धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील एंट्रीवरून राऊतांचा खोचक सवाल
Sanjay Raut on Ajit Pawar : कृषी खात्यातील एका प्रकरणात हायकोर्टाने माजी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात परत घेण्याची कवायत सुरू झाली आहे. त्यावर आज खासदार संजय राऊतांनी धारदार शब्दांचा चाप ओढला.

कृषी खात्यातील एका घोटाळाप्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बालंट टळले. त्यांना हायकोर्टाने क्लीनचिट दिली. आता त्यांच्यासाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे पुन्हा खुले करण्यात येणार असल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले. या सर्व घडामोडींवर उद्धव ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी रोखठोक भूमिका मांडली. राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांवर धारदार शब्दांचा चाप ओढला.
एवढी घाई का झाली अजित पवारांना?
या सरकारमध्ये फौजदार सुद्धा त्यांचेच, न्यायालयं सुद्धा त्यांचीच आणि चौकशी समित्या पण त्यांच्याच आहेत. त्यामुळे कुणाला क्लीनचिट दिलेल्या आहेत. द्यायच्या आहेत हे आधीच ठरलेलं असतं. त्याविषयी न बोललेलं बरं. धनंजय मुंडे यांना क्लीनचिट कोण देतंय. सरकार कुणाचं आहे. ज्या प्रकरणात त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला तो विषय अत्यंत गंभीर आहे. इतक्या घाई घाईत एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळात घेणं, अद्याप बीडमधील संतोष देशमुख खून खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे. एवढी घाई का झाली अजित पवारांना? असा सवाल राऊतांनी विचारला.
त्यांनी कानाचे पडदे साफ केले पाहिजे
कृषीमंत्री रमी खेळत आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून काढत नाहीत. याला घ्यायच, त्याला काढायचं. देवेंद्र फडणवीस, संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते पूर्णपणे बदलणे आवश्यक आहे. जे मंत्री भ्रष्ट आहेत. जे लेडिज, डान्स बार चालवतात. अशी मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस दुसरीकडे नैतिकतेच्या गप्पा मारत आहेत. फडणवीस सरकारने त्यांच्या कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे काही बोलतोय ते गांभीर्याने घ्या. नाहीतर झारखंडचे पोलीस येतील आणि तुमच्या मंत्र्याला, खासदाराला अटक करुन घेऊन जातील, असा घणाघात राऊतांनी घातला.
सुमीत फॅसेलिटीज हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. ही कंपनी काय आहे, कोणाची आहे. श्रीकांत शिंदे मेडिकल फाऊंडेशन, हे उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे चालवतात. या फाऊंडेशनमध्ये आलेला पैसा हा भ्रष्ट मार्गाने आलेला आहे. जो अटक झालेला अमित साळुंखे आहे, त्याला शिंदे पिता-पूत्रांनी गैरमार्गाने कंत्राट देण्याचे काम केले. तर याच सुमीत फॅसेलिटीजला कल्याण-डोबिंवलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट 800 कोटीला बेकायदेशीररित्या शिंदेंनी दिल्याचा आरोप राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीस हे स्वतःला नैतिक आणि जबाबदार म्हणत आहेत. पण हे तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे कॅरेक्टर असल्याची घणाघाती टीका खासदार संजय राऊतांनी केली.
