Sanjay Raut : ते तर 25 जागा जिंकू शकत नव्हते…त्यांनी राज्याच्या निवडणूक हायजॅक केली, राहुल गांधीनंतर राऊत सुद्धा आक्रमक, काय केला आरोप
Sanjay Raut on State Election : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महायुतीला मिळालेले घवघवीत यश हे निर्भेळ आणि नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. तोच सूर आता खासदार संजय राऊत यांनी आळवला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाने हायजॅक केल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लेखावर अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पूर्वीपासूनच हे सांगत होतो, असे ते म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या आडून भाजपाने त्यांचे चांगभलं केल्याचा आरोप राऊतांनी पत्र परिषदेत केला. आपण मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लेख वाचला नाही पण राहुल गांधी यांचा लेख वाचल्याचे राऊत म्हणाले.
विधानसभा निवडणूक हायजॅक
राज्यातील विधानसभा निवडणूक ही भाजपाने चोरली, लुटली आणि दरोडा घातल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी हे सातत्याने तेच सांगत आहेत आणि आम्ही सुद्धा तेच बोलत आहोत. राज्यात भाजपा आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच शकत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक आम्ही जिंकल्यावर असं त्यानंतरच्या सहा महिन्यात काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा एकतर्फी विजय प्राप्त व्हावा असा सवाल त्यांनी महायुतीला विचारला. ते तर 25 जागा सुद्धा जिंकू शकत नव्हते, असा दावा राऊतांनी केला.
लाडकी बहीण या आवरणाखाली ही निवडणूक भाजपाने हायजॅक केली असा घणाघात राऊतांनी घातला. राहुल गांधी यांनी जे पाच मुद्दे उपस्थित केले ते वारंवार केले आहेत आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा उपस्थित केल आहेत. भारतातील लोकशाही ही मोदी-शाह-फडणवीस यांनी हायजॅक केली. निवडणूक आयोगापासून अनेक संवैधानिक संस्थांना त्रास दिला आहे, असा आरोप राऊतांनी केला. खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते मोदी यांना द्यायला हवा असे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेवर टीका
संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांचे बाळासाहेबांवरील प्रेम बेगडी असल्याचा आरोप त्यांनी केला. 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार घेऊन बंड केले. शिंदेंनी थेट सेनेवरच ताबा सांगितला. राऊत त्यावेळी खूप घाबरले होते. मलाही बरोबर चल असे म्हणाले होते, असा दावा संजय राऊतांनी केला.
