Sanjay Raut : राज्यात दोनच समविचारी पक्ष; संजय राऊतांच्या विधानाने उंचावल्या भुवया, महाविकास आघाडीला तडे? भवितव्य काय पुढे?
Raj Thackeray -Udhav Thackeray : राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. त्यामुळे महाविकास आघाडीतील सध्याच्या भूमिकेवर राऊतांनी अप्रत्यक्ष टोला लगावलाय का? असा सवाल अनेकांना पडला आहे.

आज संजय राऊत यांनी तोफ पुन्हा धडाडली. राज्यात सध्या दोन दिवसांपासून बोलबच्चन हा जणू परवलीचा शब्द झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना बोलबच्चन म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहे. बोलबच्चनांची महामंडळ, महामंडलेश्वर, अध्यक्ष, ज्युनिअर बोलबच्चन असे नामकरण सुद्धा करुन झाले आहे. आज राऊतांनी या बोलबच्चनगिरीवरून तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या रोखठोकचा सामना आता सत्ताधाऱ्यांना करावा लागणार आहे. पण राऊत इतक्यावर थांबले नाही. त्यांनी राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा करून महाविकास आघाडीच्या भवितव्यावरच मोठे प्रश्न चिन्हं उभं केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय गदारोळात एका गोंधळाची भर पडली इतके नक्की.
अमित शाहांना गांभीर्याने घेऊ नका
काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खरी शिवसेना ही कुणाची आहे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे, असे वक्तव्य केले होते. त्याचा राऊतांनी आज समाचार घेतला. शाहांचे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या अस्मितेची खपली काढण्यासारखे आहे. शिंदे गट हा अमित शाहांच्या मालकीचा आहे. अमित शाहांकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांना नैराश्य आल्याचा दावा राऊतांनी केला.
मोदी हे बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष
बोलबच्चन डायलॉगवरून राऊतांनी जोरदार फटके बाजी केली. बोलबच्चनगिरीची ही प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळाल्याचा चिमटा त्यांनी काढला. आम्ही सुद्धा काही वर्षे त्यांच्यासोबत युतीत होतो. त्यामुळे तो गुण लागला असावा असा टोला त्यांनी लगावला. तर मोदी हे जागतिक बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष असल्याचा शेरा मारला. इतकेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्युनिअर बोलबच्चन असल्याचा चिमटा काढला. त्यांना अजून बोलबच्चनपणा जमत नाहीत. ते उघडे पडतात असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. राऊतांनी आज फ्रंटफुटवर येत तुफान चौकार, षटकार टोलावले.
राज्यात दोनच समविचारी पक्ष
दरम्यान संजय राऊत यांनी राज्यात दोनच समविचारी पक्ष असल्याचा दावा करून सर्वांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीकडे संकेत करत त्यांनी शिवसेना युतीसाठी सकारात्मक असल्याचा दावा केला. शिवसेनेची मानसिकता आणि भूमिका स्पष्ट आहे. मराठी माणसाची एकजूटता व्हावी असे उद्धव ठाकरे यांना वाटते असे ते म्हणाले. या एकजुटतेसाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत त्यांनी दिले. पण या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचे भवितव्य काय? असा सवाल करण्यात येत आहे.