
विनायक डावरूंग
Maharashtra Cabinet Reshuffle: राज्याच्या राजकारणात मोठ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. बुधवारी अजितदादा याचे भीषण विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चाही जोर धरू लागली आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक आघाड्यांवर राष्ट्रवादीतील हेवीवेट नेते काम करत आहे. तर आज मुंबईत वर्षानिवासस्थानी राष्ट्रवादीचे तीन नेते दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादीचे तीन नेते वर्षावर
राष्ट्रवादीचे तीन नेते वर्षावर दाखल झाले आहेत. राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. मंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठे नेते प्रफुल्ल पटेल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत. थोड्यावेळापूर्वी ही सर्व नेते मंडळी वर्षावर दाखल झाली आहेत. राष्ट्रवादीची खाती ही राष्ट्रवादी पक्षालाच मिळावी ही आग्रही मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. अजितदादा गेल्यामुळे अर्थखाते आणि इतर खाती कुणाकडं सोपवायची याची खलबतं सुरू आहे. तर यावेळी राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अर्थखाते हे राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्याकडं हे खातं सोपवावं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करावा यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर
दरम्यान अजितदादा यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद द्यावं अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून समोर आली आहे. पण अर्थखातं कुणाकडं सोपवावं, तसेच अजितदादांकडील उर्वरीत खाती कुणाकडं द्यावीत हा खरा पेच आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी आज छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याचे समजते. थोड्याच वेळात या नेत्यांची प्रतिक्रिया समोर येईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
राष्ट्रवादी एकत्रिकरणाला वेग?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून खासकरून महापालिका निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चांना वेग आला होता. दिवंगत अजितदादांनी सुद्धा याविषयीचे संकेत दिले होते. अजितदादांच्या अचानक एक्झिटनंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादीतील नेते याविषयीचे संकेत देत आहे. पण यामुळे राष्ट्रवादी महायुतीचा घटक असेल की महाविकास आघाडीचा याची चर्चा सुद्धा होत आहे. राज्यातील राजकारणात पुन्हा नवीन वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.