सत्याच्या मोर्चात एकत्र, मग महापालिका निवडणुकीसाठी का नाही? या बड्या नेत्याने टोचले कान, काँग्रेस मनसेविषयी फेरविचार करणार?
Mahavikas Aaghadi: मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे. मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा एकत्र काढता मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Mumbai Municipal Corporation Election: मनसेसह महाविकास आघाडी की मनसे शिवाय महाविकास आघाडी यावर काँग्रेसने थेट उत्तर दिले. काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला. त्यानंतर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. मनसेसह महाविकास आघाडी मुंबई महापालिकेचा गड जिंकेल अशा चर्चा होत्या. पण काँग्रेसच्या भूमिकेने समीकरणं बदलली. तर आता या ज्येष्ठ नेत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे कान टोचले आहे. मतचोरी विरोधात सत्याच्या मोर्चा एकत्रित येता मग महापालिका निवडणूक वेगळी का लढवता असा रोकडा सवाल त्यांनी केला आहे. त्यांचा वडिलकीचा सल्ला आता सर्व पक्ष ऐकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वर्षा गायकवाड यांची आगपाखड
खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मनसेविषयी काल परवा मोठी आगपाखड केली. मारहाण करणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ असा सूर त्यांनी आळवला होता. त्यांच्या या वक्तव्याला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुजोरा दिल्याने मनसेसह महाविकास आघाडीचे स्वप्न भंगल्याचे समोर आले होते. तर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी एकदिवशीय चिंतन शिबिरानंतर मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा दिला.
शरद पवार यांचा वडिलकीचा सल्ला
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेच्या युतीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार हे सकारात्मक आहे. मनपा निवडणुकीतील आघाडी अथवा ठाकरे बंधुतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पण मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेस शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान शरद पवार हे आता ठाकरे बंधूसोबत जाणार की काँग्रेसबरोबर जाणार हे अद्याप समोर आलेले नाही.
तर मुंबई पालिका निवडणूक महाविकास आघाडीतून लढली पाहिजे. मतचोरीविरोधात सत्याचा मोर्चा एकत्र काढता मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल शरद पवार यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्यांचा वडिलकीचा सल्ला ऐकून काँग्रेस मनसेविषयी नरमाई घेईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही
तर शरद पवार हे महाविकास आघाडीत आहेत. महाविकास आघाडी म्हणून ते वेगळे आहेत. मनसे हा महाविकास आघाडीचा भाग नाही असे वक्तव्य मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केले आहे. तर मनसे नेते राजू पाटील यांनी सुद्धा काँग्रेसच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.
