BMC Election 2026 : मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आतापर्यंत कोणा-कोणाला उमेदवारी जाणून घ्या
BMC Election 2026 : मुंबईत उमेदवारांच्या एबी फॉर्म वाटपाला सुरुवात झाली आहे. मातोश्रीवर त्यासाठी अनेकांना बोलवण्यात आलं आहे. मुंबईत महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. यंदाची निवडणूक ही उद्धव ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी मतमोजणी आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कालपासून उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईत भाजप-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवणार आहे. यावेळी पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांची युती झाली आहे. मराठी मतांची फाटफूट टाळण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आले आहेत. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडी बरोबर युती केली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि मनसे सोबत निवडणूक लढवू शकते.
मुंबईत महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. मुंबई महापालिकेच बजेट हे एका राज्याच्या बजेटएवढं आहे. त्यामुळे ही महापालिका जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी आपली सर्व ताकद पणाला लावतील यात शंका नाही. मतांची फाटाफूट टाळण्यासाठीच युती आणि आघाडीमध्ये निवडणुका लढवण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत आपला महापौर बसवायचा हे भाजपचं जुनं स्वप्न आहे. त्यासाठी भाजपने बऱ्याच आधीपासून तयारी केली आहे. ठाकरे बंधु मराठीच्या मुद्यावर ही निवडणूक लढवणार तर भाजप विकासाच्या मुद्यावर. मतदार कोणाला साथ देतात? ते लवकरच स्पष्ट होईल.
चेंबूरमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवारी कोणाला?
शिवसेनेच्या माजी आमदारांना मोतोश्रीवरून फोन जायला सुरवात झाली आहे. चेंबूरचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर मातोश्रीवर दाखल झाले होते. एबी फॉर्म घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. अनिल पाटणकर यांच्या पत्नी मिनाक्षी अनिल पाटणकर वार्ड – 153 मधून या वेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
मात्र त्याआधी एबी फॉर्म द्यायला मातोश्रीवर सुरुवात
मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांचे नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निश्चित झालं आहे, त्यातील काही उमेदवारांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं आहे. काही जणांना आज रात्री आणि काही जणांना उद्या एबी फॉर्मच वाटप करून अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उमेदवारांची यादी उद्या म्हणजे आज जाहीर केली जाईल. मात्र त्याआधी एबी फॉर्म द्यायला मातोश्रीवर सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाचे वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरून खान यांच्यावर मोठी जवाबदारी सोपवण्यात आली आहे. वर्सोवा विधानसभा मतदारसंघात सहा वॉर्ड असून सहा वॉर्डात ठाकरे गटाने आपला उमेदवार दिला आहे. मध्यरात्री साडेबारा वाजता आमदार हारून खान यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सहा उमेदवारांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ए बी फॉर्म देण्यात आले. यावेळी मुंबईचा महापौर मराठी असेल आणि तो ठाकरेचाच असेल असा दावा आमदार हरून खान यांनी केला आहे.
सहा वॉर्ड आणि उमेदवारांची नाव
प्रभाग क्र. ५९ यशोधर (शैलेश )फणसे प्रभाग क्र. ६० मेघना विशाल काकडे माने प्रभाग क्र. ६१ सेजल दयानंद सावंत प्रभाग क्र. ६२ झीशान चंगेज मुलतानी प्रभाग क्र. ६३ देवेंद्र (बाळा) आंबेरकर प्रभाग क्र. ६४ सबा हारून खान
