Sharad Pawar : मग होऊ द्या दूध का दूध नि पानी…, मत चोरीप्रकरणात शरद पवार मैदानात, म्हणाले काय?
Sharad Pawar on Election Commission : कालपासून राहुल गांधी हे देशातील चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी मत चोरल्याचा बॉम्ब टाकून केंद्रीय निवडणूक आयोगच नाही तर सत्ताधाऱ्यांना झटका दिला आहे. आता त्यात ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत.

दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. मत चोरीच्या त्यांच्या बॉम्बवर त्वरीत प्रतिक्रिया आली. सत्ताधारीच नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाने भराभर मतांची बिदागी टाकली. पण मत चोरीवर राहुल गांधींचे मुद्दे खोडण्यात आले का? तर हा प्रश्न अजून उत्तराच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसते. आता मत चोरीच्या प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार सुद्धा मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाला ललकारले आहेत.
राहुल गांधींच्या आरोपाने देशभरात खळबळ
राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भाजपाने मतांची चोरी केली. मतांची हेराफेरी केल्याचा खळबळजनक दावा केला. आरोपांवर न थांबता त्यांनी थेट पुरावे दिले. कर्नाटक, महाराष्ट्रात वाढलेल्या मतदारांच्या संख्येवर त्यांनी मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी मतदार याद्यातील घोळावर प्रकाश टाकला. एकाच ठिकाणचा पत्ता टाकून किती बोगस मतदार वाढवले याची जंत्रीच त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
विशेष म्हणजे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर लागलीच त्यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. भाजपच्या आमदार,खासदार, मंत्र्यांनी त्यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींचा आरोप म्हणजे नवीन बाटलीत जुनी दारू अशी टीका केली आणि त्यांना माफी मागण्यास सांगितले.
शरद पवारांनी ठोकले शड्डू
ज्येष्ठ नेते शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी राहुल गांधी यांनी मांडलेल्या मत चोरीच्या मुद्दाला समर्थन दिले. निवडणूक आयोगाला जर त्याच्यावर आक्षेप असेल तर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपावर दूध का दूध आणि पानी का पानी करावे असे आवाहन शरद पवारांनी निवडणूक आयोगाला दिले. त्यामुळे आता विरोधक मत चोरी प्रकरणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
निवडणूक आयोगांवर लावलेल्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या आरोपांवर संशय घेण्यास वाव आहे. आयोगावर लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे असे शरद पवार म्हणाले. राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. त्यांनी राहुल गांधींकडे शपथपत्र मागणे चुकीचे असल्याचे शरद पवार म्हणाले. तर निवडणूक आयोगावर आरोप झाले आहेत. राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाकडून उत्तर हवे आहे, भाजपाकडून नको, असा टोलाही पवारांनी यावेळी हाणला.
