Chhagan Bhujbal : त्यांचा दंगली भडकवण्याचा डाव, जरांगेंच्या आरोपानंतर भुजबळ खवळले, म्हणाले अगोदर त्याला…
Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चानंतरही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी थांबल्या नाहीत. मंत्री छगन भुजबळ विरोधात मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असा वाद पेटला आहे. त्यात भुजबळांनी आज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

Chhagan Bhujbal demand to arrest Manoj Jarange : बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मोर्चानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे. त्याचे पडसाद आजही उमटले. मंत्री छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यात आज सामना रंगला. त्यात वडेट्टीवार यांचे तर वेगळेच दुःख दिसले. जरांगे आणि आता भुजबळ हे आपल्यावर टीका करत असल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर थेट हल्ला केला.
कालच्या बीड येथील सभेवर बोलताना जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ हे दोन समाजात तेढ निर्माण करत आहेत. ते दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. गृहमंत्रालयाने भुजबळांचा जामीन रद्द करुन त्यांना अटक करण्याची मागणी जरांगे यांनी केली होती. आज त्यावर भुजबळांनी थेट प्रतिक्रिया दिली.
जरांगेंना अटक करण्याची मागणी
खरे म्हणजे तर या जरांगेंनाच अटक करायला हवे. बीडची आमदारांची घरं कुणी जाळली. हॉटेल्स कुणी जाळली. बीड पेटवलं कुणी, लोकप्रतिनिधींच्या, जयदत्त क्षीरसागरांच्या लहान मुलं धुरात गुदमरत होती. त्यावेळी मुस्लीम समाजाच्या तरुणांनी मागील भिंतीवरून उड्या मारून या मुलांना वाचवलं. अरे, कारवाई तर तुझ्यावर झाली पाहिजे होती रे. ज्या पद्धतीने तू सांगतोस की, जो आपल्या विरोधात जाईल. त्यांना चोपून काढा अशा भाषेत ते बोलत आहेत.
जे विरोधात जातील त्यांचे सर्व उमेदवार पाडा. हे तुम्ही बोलतायेत. मारामारीची भाषा तुम्ही केली आणि आज नाभिक समाजाची लोकांची डोकं तुम्ही फोडली. नवनाथ वाघमारेंची गाडी तुम्ही जाळली. लक्ष्मण हाकेंच्या कार्यकर्त्याला तर तुम्ही मार मार मारला. का? तर तो हाकेंसोबत राहतो म्हणून. मरता मरता तो वाचला. तुम्ही चिथावणी देत आहे. तुम्ही हॉस्पीटलमध्ये असता. कोणता आजार तुम्हाला झाला हे देवालाच माहिती आहे, असा टोला भुजबळांनी लगावला. तो कायम माझ्यावर काही तरी बोलतो, म्हणून मी त्याच्यावर बोललो. तो बोलत राहील आणि आम्ही किती दिवस गप्प राहायचं असा सवाल भुजबळांनी जरांगेंच्या टीकेवर केली.
विखेंच्या भूमिकेवर तोंडसूख
दरींदेने चार दिवस मुंबई वेठीस धरली. मराठा नेते काही चांगले आहेत. योग्य निर्णय घेतात. काही जण त्यांच्या जवळ पायथ्याशी बसतात. ‘ पात्र ‘ शब्द काढायला लावतात. विखे पाटील काय निर्णय घेतात. मुख्यमंत्री बाहेर असतांना देखील GR काढतात. आमचे म्हणणे पात्र आहे त्यांना द्या. पण ‘ पात्र ‘ तो शब्दही काढायला लावला. हे सगळे चुकीचे सुरू आहे. आयोग, हायकोर्ट यांचे निर्णय डावलले जात आहे. आंदोलन झाल्यावर ही ओबीसीच्या जखमीवर मीठ चोळायला विखे गेले. विखेंना जायचे काही कारणच नाही. ओबीसी भाजपाचा DNA आहे म्हणतात. मग त्यावर परिणाम होणार नाही का. ओबीसींना बाजूला करून भाजपची शक्ती वाढणार नाही, असे भुजबळांनी ठणकावले.
ओबीसींसाठी वेगळा मतदारसंघ का नाही?
दलित, आदिवासी इतरांसाठी राखीव मतदार संघ आहे. मग ओबीसीसाठी वेगळा मतदार संघ का नाही ? असा सवाल भुजबळांनी केला. त्यांच्या या नवीन मागणीनी राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधले आहे. जरांगे माझ्या मतदार संघात येऊन गेले. पण तरीदेखील माझ्या मतदार संघात काहीच फरक पडला नाही, असा टोलाही भुजबळांनी जरांगे पाटलांना लगावला.
