नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते आज शिवबंधन बांधणार, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

prajwal dhage

|

Jan 08, 2021 | 7:04 AM

नाशिक : महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली असताना नाशिकमध्ये राजकीय वारे वाहायला सुरुवात झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी कालच (7 जानेवारी) शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. राऊतांशी तब्बल दोन तास चर्चा केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं. आज (8 जानेवारी) संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनाप्रवेश होईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या निवासस्थानी म्हणजेच मातोश्रीवर हा प्रवेशसोहळा होईल. (Vasant Gite and Sunil Bagul will join shivsena in presence of Uddhav Thackeray)

नाशिक महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. पालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व पक्ष जमेल त्या पद्धतीने राजकीय दावपेच टाकत आहेत. शिवसेनेनेही रणनीती आखायला सुरुवात केली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आता नाशिक भाजपचे दोन बडे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नगरसेवकसुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सानप गेल्याची उणीव भरुन काढणार

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. ते पंचवटी परिसरात राहतात. पंचवटी परिसरात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला असल्याचे सांगितले जात होते. हीच पोकळी भरुन काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे प्रयत्न सुरु होते. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेक वेळा नाशिकचा दौरा केला. पंचवटी परिसरातून तब्बल 24 नगरसेवक निवडून जातात. नाशिकचा महापौर ठरवण्यामागे पंचवटीची नेहमीच मोठी भूमिका राहिली आहे. सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेला किमान 15 जागांवर नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळेच सानप यांनी पक्ष बदलल्याचा वचपा काढण्यासाठीच शिवसेनेने ही फिल्डिंग लावल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे विद्यमान नाशिक महानगरप्रमुख महेश बडवे आणि सचिन मराठे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. महेश बडवेंकडे पंचवटी, नाशिक, पश्‍चिम आणि सिडको, तर सचिन मराठे यांच्याकडे नाशिक रोड पूर्व आणि सातपूर विभागाची जबाबदारी होती.

संबंधित बातम्या :

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

(Vasant Gite and Sunil Bagul will join shivsena in presence of Uddhav Thackeray)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें