Keerti Pujar : इकडं आभाळ फाटलं, पण धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना थिरकण्याचा मोह आवरेना, चोहोबाजूंनी टीकेचा भडीमार
Dharashiv Collector Dance : धाराशिव जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला.

Collector Keerti Pujar Dance : धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचे समोर आले आहे. जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाच गाण्यात व्यग्र असल्याचे दिसून आल्याने संताप व्यक्त होत आहे. 24 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला. जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याने नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले.
धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पूर आला. संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत. बुधवार 24 सप्टेंबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लातूर आणि सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनीही भूम, वाशी आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान भरपाईचा अंदाज घेतला. अजूनही या जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा असल्याचे दिसून येत आहे. मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस पावसाची रझाकारी पाहायला मिळणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची असंवेदनशीलता
मात्र सायंकाळी याच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर येथे आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आपल्या पत्नीसह आणि धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी कलावंतासह डान्स केला. एकीकडे मराठी जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक पुरासारख्या संकटामध्ये असताना जिल्हाधिकारी यांनी ही आपली त्यांच्या प्रति असलेली असंवेदना दाखवून दिली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. काहींनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बाजू उचलून धरली. लोककलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचा काहींचा दावा आहे.
मराठवाड्यात मोठे नुकसान
नांदेड, जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पूराचा मोठा फटका बसला. शेताला तलावाचे स्वरूप आले आहे. तर काही गावांना पुराचा वेढा पडला आहे. मराठवाड्यात लहान मोठी 150 जनावरं दगावली. तर मराठवाड्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. यंदाच्या खरीप हंगामात जवळपास 1200 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यात लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे.
