आरक्षणावरून राष्ट्रवादीतच जुंपली, अजितदादांच्या त्या मागणीला छगन भुजबळांचा विरोध
Ajit Pawar -Chhagan Bhujbal : आरक्षणाच्या मुद्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जुंपली आहे. नागपूरमध्ये चिंतन शिबिरातील मात्रा काही लागू पडलेली दिसत नाही. छगन भुजबळांनी थेट दादांच्या त्या मागणीला कडाडून विरोध केला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी आता राष्ट्रवादीतच आपले ‘बळ’ दाखवले आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी अजितदादांच्या भूमिकेलाच थेट विरोध केला आहे. महायुती सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यांच्या मराठा आरक्षणाविषयीच्या मागण्यासाठी जीआर काढला. तेव्हापासून महायुतीवर छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी या जीआरला आणि राज्य सरकारच्या आदेशाला विरोध केला. प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू केली. बॅकडोअरने मराठ्यांची ओबीसीतील (Maratha OBC) प्रवेश सुरू असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरक्षणाविषयी काल एक वक्तव्य केले. त्याला छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला.
अजितदादा काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आरक्षणाविषयी मोठे वक्तव्य केले. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचे दुमत असण्याचे कारण नाही, अशी भूमिका अजितदादांनी स्पष्ट केली होती. राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी केवळ माणूस पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात आणि समाजात तेढ निर्माण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते, असेही दादा म्हणाले.
पण त्यांच्या या विधानावर भुजबळ मात्र चांगलेच नाराज झाल्याचे दिसले. त्यांनी अजितदादांच्या वक्तव्याला त्यांचा विरोध दर्शवला. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून भुजबळ महायुतीतच नाही तर पक्षातही नाराज असल्याचे समोर येत आहे.
आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही
छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा एक समाज, एक जात आहे. तर इतर मागास, OBC हा प्रवर्ग आहे. यामध्ये अनेक जाती आहेत. त्यांच्यासाठी ही आरक्षणाची तरतूद आहे. ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्टीने आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. त्यांनी अजितदादांच्या आर्थिक आरक्षणाच्या मुद्दाला तीव्र हरकत घेतल्याचे दिसते. ओबीसीच्या मुद्यावरून छगन भुजबळ यांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यासाठी त्यांनी लातूर दौरा केला. नागपूर येथे ओबीसी नेत्यांची बैठक घेतली.
