चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात, त्यामुळे त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका; जयंत पाटील यांचा खोचक टोला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. (jayant patil slams chandrakant patil over aryan khan case)

चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात, त्यामुळे त्यांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नका; जयंत पाटील यांचा खोचक टोला
जयंत पाटील, जलसंपदा मंत्री

रत्नागिरी: चंद्रकांत पाटील हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आलं आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने गणपतीपुळे रत्नागिरी येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर व इतर प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली असता जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करत आहेत. मात्र त्यांना इतकं महत्त्व देण जरुरी नाही, असे पाटील म्हणाले.

भाजपने वानखेडेंचा कार्यक्रम करू नये

भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नवाब मलिक माहिती उघड करत आहेत. त्याला समीर वानखेडे उत्तर देतील. मात्र समीर वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान यांच्या कारवाईतील नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीत सर्व काही उघड झाले आहे. यात वानखेडे आणि मलिक आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पाडतील. यामध्ये पडून भाजपाने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट मत त्यांनी केले.

केवळ सत्ताधारी दिसतात का?

भारतात 120 कोटी लोकसंख्या असतानाही केंद्रीय यंत्रणेला केवळ महाराष्ट्रातील आणि त्यांच्याविरोधी बोलणारे त्यातही केवळ राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेते दिसत आहेत. बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील खासदारच सांगतात की, आता आम्हाला रात्रीची शांत झोप लागते. म्हणजेच भाजपात तुम्ही गेलात की सगळ्याला अभय आहे. परंतु विरोधात आवाज उठवला की त्यांची दहा-वीस वर्षांपूर्वीची कागदं काढायची आणि चौकशीचा ससेमिरा सुरु करायचा, रेड टाकायची, त्यांची बदनामी करण्याचे काम केंद्रीय यंत्रणा करतेय हे दुर्दैव आहे, असेही त्यांनी सांगितलं.

नव्याने पक्षबांधणी करा

अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करण्याचे आमचे ध्येय आहे आणि आपल्या मदतीने आम्ही ते करणारच असा आत्मविश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला. माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून हतबल व्हायचे नाही. त्यांना जावून एक टर्म पूर्ण झाली आतापर्यंत आपले नवं संघटन येथे तयार व्हायला हवे होते. त्यामुळे मरगळ झटकून नव्याने पक्षाची बांधणी करा, असे आवाहन त्यांनी केले.

लोकांच्या मनात स्थान निर्माण करा

आपला पक्ष सत्तेत आहे. आपल्याला विकासात्मक कामासाठी जी मदत हवी ती मदत केली जाईल. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या मनात स्थान निर्माण करा. विकासाच्या बाजूने उभा राहणारा एक मोठा गट रत्नागिरीत आहे, पवारसाहेबांवर प्रेम करणारा गट या भागात आहे. या लोकांना आपल्या बाजूला आणण्यासाठी काम करा. मला खात्री आहे हे लोक आपल्या मागे उभे राहतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक चांगला निकाल याठिकाणी मिळेल, असा विश्वास खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

जयंत म्हणजे काय?, तटकरेंनी सांगितला अर्थ

आपल्याला सर्व गटतट बाजूला ठेवून संघटनेवर लक्ष केंद्रीत करावे लागेल. प्रत्येक वेळी प्रांताध्यक्ष येथे येऊ शकत नाही हा बदल तुम्हालाच करावा लागेल. प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसला एक नंबरचा पक्ष बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे, असेही तटकरे म्हणाले. जयंत या नावाचा अर्थ हा विजय असतो, मला आठवतंय जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली अनिकेत तटकरे यांची निवडणूक ही पहिली निवडणूक होती आणि अनिकेत तटकरे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते याची आठवण खासदार सुनिल तटकरे यांनी सांगितली.

 

संबंधित बातम्या:

लेकाच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई, पण एक चूक नडली, आर्यनची आजची रात्रही तुरुंगातच

आर्यनच्या सुटकेचा सस्पेन्स आणि हाय व्होल्टेज ड्रामा; दिवसभरात नेमकं काय घडलं?

आर्यन खानला जामीन, NCB ला आता काय करावं लागेल? तपास अधिकाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, उज्वल निकम म्हणाले…

(jayant patil slams chandrakant patil over aryan khan case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI