अमरावती: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची पहिली मुख्यमंत्री म्हणून आपल्याला महिलेला बसवायचं आहे, अशी घोषणा शिवशक्ती-भीमशक्तीच्या मेळाव्यात केली. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं स्वागत होत असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. तसं झालं तर आम्हाला अभिमानच वाटेल असं नवनीत राणा म्हणाल्या. नवनीत राणा आणि ठाकरे गटात विस्तवही जात नाही. संधी मिळताच नवनीत राणा ठाकरे गटाला घेरण्याचं काम करत असतात. मात्र, आज त्यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या या विधानाचं समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.