Lok Sabha Elections 2024 : प्रचाराचा ज्वर शिगेला, आज मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे नाशिकमध्ये, मुंबईत मोदींचा रोड शो, वाहतुकीत बदल
Narendra Modi in Mumbai and nashik : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. तसेच कल्याणमध्ये सभा घेण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्या बंदोबस्तसाठी पोलिसांचा मोठा फोजफाट्यासह 11 बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथक तैनात केले आहे.

राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचाराचा धडका सुरु आहे. राज्यात बुधवारी नाशिक आणि मुंबईत प्रचाराचा ज्वर शिगेला पोहचणार आहे. नाशिकसाठी आज सभांचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन दिग्गज नेत्यांची आज नाशिक जिल्ह्यात सभा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो मुंबईत होणार आहे.
नाशिकमध्ये तीन दिग्गज नेत्यांचा सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमधील पिंपळगाव बसवंत येथे सभा होणार आहे. शरद पवार यांची वणी तर उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी शिवसेना उबाठाचे उमेदवार राजाभाऊ वाजेसाठी मैदानात उतरणार आहे तर शरद पवार यांची वणी येथे दिंडोरीचे उमेदवार भास्कर भगरेंसाठी सभा होणार आहे. या तिन्ही सभांकडे आज विशेष लक्ष लागले आहे. आजच्या सभेतून हे तीन दिग्गज नेते काय बोलणार याकडे नजरा लागल्या आहेत.
मुंबईत मोदी यांचा रोड शो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. तसेच कल्याणमध्ये सभा घेण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्या बंदोबस्तसाठी पोलिसांचा मोठा फोजफाट्यासह 11 बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथक तैनात केले आहे. मोदी यांचा घाटकोपर येथे रोड शो होणार आहे. साडे सहा वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७.४५ ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.
कल्याणमध्ये मोदी यांची सभा
ठाणे, भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणात येत आहेत. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सभा होणाऱ्या ठिकाणाच्या परिसरामध्ये वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणे शहर पोलीस उप आयुक्तांकडून याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहीर सभेसाठी सुमारे 1 लाखांच्या आसपास नागरिक येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सभास्थळाच्या आसपासच्या परिसरातील वाहतुकीत वाहतूक पोलिसांकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवार रात्री 12 वाजल्यापासून बुधवारपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
वाहतुकीत असा केला बदल
- आधारवाडी चौक सिग्नल ते गांधारी ब्रिज पावेतो बापगाव संपूर्ण रोड व सदर रोडला मिळणारा आतील रोड (कट) येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग: ही वाहने वाडेघर सर्कल वाडेघर गाव, काशी दर्शन बिल्डींग कडून (साईकृपा अॅटो गॅरेज) उजवे बाजूस वळण घेवून निलकंठ सृष्टी सोसायटीच्या डाव्या बाजूने मार्गस्थ होवून रोनक सिटी मार्गे साई सत्यम बिल्डींग, मुथा कॉलेज वेदांत हॉस्पिटल मार्गे इच्छित स्थळी जातील.
- गांधारी चौक ते भट्टी चाय (सनसेट) संपूर्ण रस्ता ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
- पर्यायी मार्ग: ही वाहने भट्टी चाय (सनसेट) थारवानी बिल्डींगकडून उजवे बाजूने झुलेलाल चौक येथून डावे वळण घेवून गोदरेज हिल बारावे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
- रूतू बिल्डींगकडे जाणाऱ्या रस्त्यावर ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: ही वाहने रूतू बिल्डींगकडून वेदांत हॉस्पिटल मुथा कॉलेज पाण्याच्या टाकी जवळून पुढे इच्छित स्थळी जातील.
- डी मार्टकडून अग्रवाल कॉलेज मातोश्री हॉस्पिटल कडे येणाऱ्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहने डी मार्ट ते वसंत व्हॅली वायलेनगर मार्गे इच्छित स्थळी जातील.
- महाराजा अग्रसेन चौक कडून हिना गार्डन, तुलसीपुजा चौक, कस्तुरी पार्क, गणपती चौक कडे जाणाऱ्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग: ही वाहने महाराजा अग्रसेन चौककडून डावीकडे वळून वायलेनगर येथून खडकपाडा ते दुर्गाडी अशा मुख्य वाहिनीस मिळून इच्छित स्थळी जातील.
- डी बी चौक ते गणपती चौक, निक्कीनगर मार्ग ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहने डी बी चौक ते ओम रेसीडन्सी समोरून डावे बाजूस वळून निलकंठ सृष्टी सोसायटीच्या उजवे बाजूने काशी दर्शन बिल्डींग समोरून डावे बाजूकडे वाडेघर गाव वाडेघर सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
- आधारवाडी सिग्नल चौक ते आधारवाडी जेल, डी बी चौक रस्ता वाहनांस ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहने वाडेघर सर्कल हनुमान मंदीर, वाडेघर, काशी दर्शन बिल्डींग, समर्थ कृपा अॅटो गॅरेज कडून उजवे बाजूस निलकंठ सृष्टीच्या डावे बाजूने वळण घेवून ओम रेसीडन्सी समोरून पुढे इच्छित स्थळी जातील.
- वायलेनगर पोलीस चौकीकडून आधारवाडी जेल रोड कडे जाणाऱ्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
