खडसे आणि ‘मोठ्या साहेबांनी’ माझ्या वडिलांना अडकवलं, प्रफुल लोढाच्या मुलाचा खळबळजनक आरोप!
प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी समोर येत खडसे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी निखील खडसे यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

Prafulla Lodha : राज्यातील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या प्रकरणात प्रफुल लोढा या व्यक्तीचे नाव घेतले जात असून त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. ही व्यक्ती गिरीश महाजन यांच्या खूप जवळची व्यक्ती आहे, असा दावा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. तर महाजन यांनी खडसेंचे सगळे दावे फेटाळून लावले होते. दरम्यान, आता प्रफुल लोढा यांच्या मुलाने टीव्ही 9 मराठीशी खास बातचित करत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ खडसे आणि ‘मोठ्या साहेबांनी’ माझ्या वडिलांना अडकवलंय असं विधान प्रफुल लोढा यांचा मुलगा पवन लोढा यांनी केलंय.
खडसे आणि मोठे साहेब यांनी अडकवलं आहे
प्रफुल लोढा यांचे चिरंजीव पवन लोढा यांनी टीव्ही 9 मराठीसी Exclusive बातचित केली आहे. यावेळी बोलताना प्रफुल लोढा यांच्याविरोधात जे गुन्हे दाखल झाले आहे, ते अत्यंत खोटे आहेत. त्यांना एकनाथ खडसे आणि मोठे साहेब यांनी अडकवलं आहे, असा खळबळजनक दावा केला आहे. माझ्या वडिलांच्या विरोधात गुन्हा मुंबईमध्ये दाखल होतो आणि आमच्या जळगावच्या जामनेरच्या घरी चौकशी होते. पहूरच्या व्यापारी संकुलातही चौकशी होते. ही चौकशी करण्याचं, छापा टाकण्याचा कुठलं कारणच नाही. पोलीस जे पेन ड्राईव्ह घेऊन गेले, ज्या सीडी घेऊन गेले ते सर्व साहित्य माझ्या कामाचे आहे. मी महावितरण कंपनीचे काम करतो. ते पेन ड्राईव्ह आणि सीडी माझ्या त्याच कामाचे होते, असं पवन लोढा यांनी यांनी सांगितले आहे.
एकनाथ खडसे मुद्दामच हा मुद्दा उचलत आहेत
गेल्या काळातसुद्धा बीएचआर च्य पतसंस्थेच्या माध्यमातून आमच्या घरावर छापे टाकण्यात आले. त्यावेळीसुद्धा गिरीश महाजन यांच्या संदर्भातली सीडी वगैरे काही मिळते का ते तपासण्यासाठीच आमच्याकडे छापे टाकण्यात आले. जिल्ह्यात गिरीश महाजन यांच्यापेक्षा कोणी मोठा नेता नसल्यामुळे एकनाथ खडसे मुद्दामच हा मुद्दा उचलत आहेत, असं पवन लोढा यांनी म्हटलंय.
बापजाद्यांची जी इस्टेट आहे की काही कमी नाही
गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी, त्यांची बदनामी करण्यासाठी खडसे असा आरोप करत असल्याचाही दावा पवन लोढा यांनी केलाय. एकनाथ खडसे जेंव्हा गाडीमध्ये रॉकेल टाकून फिरायचे तेव्हा ते माझ्या वडिलांकडे यायचे. ते माझ्या वडिलांना पैसे मागायचे. आमची बापजाद्यांची जी इस्टेट आहे की काही कमी नाही. आमची जी मालमत्ता आहे, ती सर्वच्या सर्व वडिलोपार्जित आहे. एकनाथ खडसे यांनी कोणतीही चौकशी लावावी. त्या संदर्भात आम्हाला कुठलीही अडचण नाही, असं म्हणत पवन लोढा यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या मालमत्तेबाबत करण्यात येत असलेले आरोप खोटे आहेत असं सांगितलं.
निखील खडसेंच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे
निखील खडसे यांच्या मृत्यूमुळे माझे वडील प्रफुल लोढा यांनासुद्धा मोठा धक्का बसला होता. त्यामुळेच त्यांनी 2020 मध्ये पत्रकार परिषद घेत त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली होती. प्रफुल लोढा यांनी ज्या एसआयटी चौकशीची मागणी केली होती ती चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीसुद्धा यावेळी यांचे चिरंजीव पवन लोढा यांनी केली.
