शेलार यांना सांस्कृतिक म्हणावं की असांस्कृतिक? प्रकाश महाजन संतापले, भाजपलाही सुनावलं
विजय मेळाव्यावरून आता आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे, भाजपच्या आरोपांनंतर आता प्रकाश महाजन यांनीही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही निर्णय रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोपाला उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील या मेळाव्यावरून मनसे आणि शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
दरम्यान त्यानंतर आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे. त्यांनी यावरून आशिष शेलार आणि प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी यावेळी भाजपला देखील चांगलंच सुनावलं आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश महाजन?
दोन्ही बंधू मराठी भाषेसाठी एकत्र आले, पूर्वी एक पक्ष होता घराघरात भावा भावात काका पुतण्यात भांडण निर्माण करणारा, ती जागा आता भाजपने घेतली आहे. पूर्वी ऋषीं मुनी यज्ञ करायचे आणि राक्षस विघ्न आणायचे, पूर्वीचे राक्षस आक्राळ विक्राळ होते, आताचे सभ्य आहेत पॅन्ट शर्ट घातलेले आहेत, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. कालच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याआधी भाषण केलं, यावरून चर्चा सुरू होती, याला उत्तर देताना प्रकाश महाजन यांनी असा खोचक टेला लगावला आहे.
दरम्यान भाजप नेते आशिष शेलार यांनी देखील या मेळाव्यावरून शिवसेना ठाकरे गटावर आणि मनसेवर निशाणा साधला होता, त्यांना देखील महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यश पाहून सरकार अस्वस्थ झालं आहे, यामुळं सरकारमधील काही मंत्री असंबंध बोलताहेत, त्याच्यातलेच एक मंत्री आशिष शेलार आहेत, आशिष शेलार यांना सांस्कृतिक म्हणावं की असांस्कृतिक म्हणावं, त्यांच्यावर संस्कार नाहीत असा टोला यावेळी महाजन यांनी लगावला आहे.