‘फुकट बिर्याणी’ फुकटातच मिळणार की महागात पडणार? ‘त्या’ ऑडिओ क्लिपवरुन अद्याप कारवाईला सुरुवातच नाही!

ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत आदेश अद्याप जारी झालेला नसल्याची माहिती मिळत आहे.

'फुकट बिर्याणी' फुकटातच मिळणार की महागात पडणार? 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन अद्याप कारवाईला सुरुवातच नाही!
mutton biryani and Pune Police


पुणे : पुण्यातील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली. या ऑडिओ क्लिपमध्ये संबंधित महिला अधिकारी मटण बिर्याणीची ऑर्डर आणायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहे. महत्वाची बाब म्हणजे त्यांना ही बिर्याणी फुकट हवी आहे. आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे देण्याची गरज काय? असंही त्या आपल्या कर्मचाऱ्यांना सांगताना या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना हा प्रकार गंभीर आहे. याची चौकशी करण्याचे आदेश आपण दिल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली आहे. मात्र, याबाबतचा अधिकृत आदेश अद्याप जारी झालेला नसल्याची माहिती मिळत आहे. (No action has been taken yet regarding the viral audio clip of Pune police)

दरम्यान, ही ऑडिओ क्लिपमधील आवाज पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांचा असल्याचं बोललं जात होतं. त्याबाबत स्पष्टीकरण देताना, ‘माननीय गृहमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात जे सत्य आहे त बाहेर येईल. तसंच मी स्वत:ही सायबर सेलकडे तक्रार दाखल करणार आहे. चौकशी होऊ द्या. त्यातून सगळं कळेल. पोलीस विभागाची गरिमा राहावी म्हणूनच मी इथे आल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. जे चुकीचे लोकं होते त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, सरळ करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे प्रकार होत होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज माझ्या नावाने हे व्हायरल केलं गेलं आहे. माननीय गृहमंत्रीसाहेब बोलले आहेत आणि चौकशी योग्यरितीने झाली तर ते शक्य होईल’, असं नारनवरे यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांनीही अद्याप सायबर सेलकडे तक्रार केलेली नाही.

कारवाई की तडजोड होणार?

संबंधित ऑडिओ क्लिप मॉर्फ केली असल्याचा आरोप नारनवरे यांनी केला होता. तसंच आपण सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे तोंडी आदेश दिले होते. मात्र, त्याबाबत अधिकृत आदेश अद्याप जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या या प्रकाराची चौकशी कायदेशीरपणे होणार की तडजोड केली जाणार? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचं फोनवरील संभाषण चांगलंच व्हायरल होत आहे. पुण्यातील डीसीपी मॅडमला एसपी हॉटेलची बिर्याणी हवी आहे, तीही मोफत! डीसीपी मॅडमची ही फर्माईश आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट पोलीस महासंचालकांनाच पत्र लिहिलं आहे. दरम्यान, आम्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीत.

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

ऑडिओ क्लिप तुम्हीच ऐका

मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

संबंधित बातम्या :

एसपीची फुकट बिर्याणी महागात, पुण्यातील महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

‘बिर्याणीच्या ऑर्डरची ती ऑडिओ क्लिप हे षडयंत्र’, पुण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याचा आरोप

No action has been taken yet regarding the viral audio clip of Pune police

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI