पुण्यातील रेव्ह पार्टीत खडसेंच्या जावयाला पकडताच संजय राऊत भडकले, म्हणाले गिरीश महाजन…
पुण्यात एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह सहा जणांना अटक केली आहे. या पार्टीत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि मद्यपान होत असल्याचे समोर आले आहे. या घटनेवरून राजकारण तापले आहे.

पुण्यात एका हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पुण्यातील खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या हाऊस पार्टीवर करण्यात आली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचे सेवन सुरू होते, अशी माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांना पुण्यातील रेव्ह पार्टीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. तुमचा संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.
संजय राऊतांचा थेट आरोप काय?
“माझ्याकडे त्याबद्दल काहीही माहिती नाही. या सरकारच्या काळात कधी कोणाला अटक होईल, कधी कोणावर गोळीबार होईल आणि सरबत पिणाऱ्या माणसालाही दारु पितो म्हणून अटक केली जाईल. काहीही होऊ शकतो. पोलीस आणि पोलिसांची यंत्रणा भाजप विरोधात असलेल्यांना याप्रकारे त्रास देण्यासाठीच इथे आहेत. बाकी सरकारमध्ये काहीही काम नाही. मी याबद्दल माहिती घेईन. याआधीही खडसेंच्या जावयाला ईडीने ताब्यात घेतलं होतं, पण त्यात काही मिळालेलं नाही. दोन दिवसांपासून खडसे हे सरकारच्या विरुद्ध खास करुन गिरीश महाजनांच्या विरोधात ठामपणे भूमिका मांडतात. ते पुराव्यांसह बोलतात. त्यानंतर पुढील 24 तासात ही रेव्ह पार्टीची कारवाई झाली. एकनाथ खडसेंनी जे मुद्दे मांडले, जे आरोप केले, त्याची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. ही पार्टी, ती पार्टी, मग तुमचं काय सुरु आहे. तुमचा संपूर्ण भारतीय जनता पार्टी ही एक रेव्ह पार्टी आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
पुण्यात नेमकं काय घडलं?
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या रेव्ह पार्टीबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ खराडी येथील फ्लॅटवर छापा टाकला. या छाप्यातून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी या पार्टीत सहभागी असलेल्या दोन महिला आणि चार पुरुषांना ताब्यात घेतले आहे. हे सर्वजण उच्चभ्रू वर्गातील असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासोबत त्यांचा एक मित्र आणि तीन महिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टीत दारू, हुक्का आणि काही प्रमाणात अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते. ताब्यात घेतलेल्या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
