महायुतीच्याच नेत्यांविरोधात फिल्डिंग, शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना मतदारसंघातच घेरणार; महादेव जानकर यांचा मोठा प्लान काय?
"मी देणारा आहे. घेणारा नाही. मला विधान परिषद देत होते. पण मी घेतली नाही. आम्हाला महायुतीतील पक्षांनी विश्वासात घेतलं नाही. आम्हाला कसल्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलवलं नाही. त्यामुळे आम्ही महायुतीतून बाहेर पडलो. आता महायुतीत बोलावलं तरी परत जाणार नाही", अशी भूमिका महादेव जानकर यांनी मांडली.
राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली आहे. महादेव जानकर आता स्वबळावर राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार उतरवणार आहेत. तसेच जानकर प्रत्येक मतदारसंघात सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा प्लॅनच जानकरांनी आखून ठेवला आहे. महादेव जानकर यांनी आज दौंडमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली आगामी काळासाठी काय रणनीती ठरली आहे, याबाबत थोडक्यात माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार जानकरांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोठा प्लान आखून ठेवल्याचं सध्याचं चित्र दिसत आहे.
“राष्ट्रीय समाज पक्षाचे राज्यात मेळावे सुरू आहेत. अनेक मतदारसंघाचे मिळून मेळावे घेतले जात आहेत. आज दौंडच्या उमेदवाराचे नाव जाहीर होणार नाही. फक्त मेळावा होणार आहे. दौंडसाठी सक्षम उमेदवार आल्यानंतर नाव निश्चित केले जाईल. आज लोकांचे मत जाणून घेण्यात येईल. पार्लमेंटरी बोर्डाकडे ती यादी पाठवून नाव निश्चित केले जाईल. दौंडसाठी दोन-तीन जणांची नाव आले आहेत. पण पार्लमेंटरी बोर्डाकडे अंतिम निर्णय आहे”, अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली.
महादेव जानकर संतापात म्हणाले…
“मी देणारा आहे. घेणारा नाही. मला विधान परिषद देत होते. पण मी घेतली नाही. आम्हाला महायुतीतील पक्षांनी विश्वासात घेतलं नाही. आम्हाला कसल्याही जागांची चर्चा किंवा बैठकीला बोलवलं नाही. त्यामुळे आम्ही महायुतीतून बाहेर पडलो. आता महायुतीत बोलावलं तरी परत जाणार नाही. महाविकास आघाडी आणि महायुतीत देखील आता जाणार नाही. आता आमचं काय होईल यासाठी आम्ही खंबीर आहोत”, असं जानकर म्हणाले. “भाजप म्हणेल आमचा विजय होतोय, महायुती म्हणेल आमचा विजय होतोय आणि महाविकास आघाडी म्हणेल आमचा विजय होतोय. मला त्यांच्याबद्दल अजिबात विचारू नका. त्यांच्याबद्दल बोलण्याचा मी मक्ता घेतला नाही”, असं महादेव जानकर संतापात म्हणाले.
“2014 मध्ये दौंडमधील जनतेने आमदार निवडून देऊन माझ्यावर उपकार केले आहेत. राष्ट्रीय समाज पक्ष सक्षम उमेदवार देणार आहे. आता उमेदवार जाहीर केला तर ते उमेदवार पळवून नेतील. 288 जागांपैकी 191 उमेदवारांची यादी तयार आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष नक्कीच खाते उघडेल”, अशी आशा महादेव जानकर यांनी व्यक्त केली.
जानकरांचा महायुतीला मोठा इशारा
“अजित पवारांची बारामती, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, चंद्रशेखर बावनकुळे यांचे कामठी या ठिकाणी सभा घेणार आहोत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथे देखील आणि राज्यातील सर्व ठिकाणी सभा घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कोपरी या ठिकाणी देखील सभा घेणार आहोत. मी या निवडणुकीत कोणालाही सोडणार नाही”, असा इशारा महादेव जानकर यांनी दिला.
“भाजप आणि काँग्रेस आम्हाला समान अंतरावर आहेत. दोन्हीही मोठे पक्ष छोट्या पक्षांना खात आहेत. मी आमदार करणारा माणूस आहे. त्यांच्याकडे मी भीक मागत बसू का? असा सवाल महादेव जानकर यांनी केला. उद्याचे राज्य सरकार बनेल. पण मला विचारल्याशिवाय मुख्यमंत्री बनणार नाही”, असा मोठा दावा महादेव जानकर यांनी केला.