वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन रुग्णालयात गेला अन्…, राजेंद्र हगवणे बद्दल धक्कादायक माहिती समोर
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. आता वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणेबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वैष्णवी हगवणे नावाच्या तरुणीनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या छळाला कंटाळून तीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासू, सासरा आणि नणंद यांना अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होत आहेत. आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. मात्र वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि तिचा दीर फरार होते, त्यांना नंतर अटक करण्यात आली. दरम्यान 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केली, त्यानंतर वैष्णवीचा मृतदेह औंधच्या जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी आणण्यात आला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी राजेंद्र हगवणे हा वैष्णवीचा मृतदेह पाहाण्यासाठी 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन रुग्णालयात आला होता, त्याचवेळी त्याला गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकुण लागली आणि तिथूनच तो फरार झाल्याची माहिती आता समोर येत आहे, त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी या प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप केले आहेत. हगवणे कुटुंब आणि जालिंदर सुपेकर यांचे जवळचे संबंध आहेत. हगवणे कुटुंब सुपेकर यांचा त्यांच्या सूनांना धाक दाखवायचं, हगवणे कुटुंबाची सून मयुरीच्या आईने याविरोधात महिला आयोगाला एक पत्र देखील लिहिलं होतं, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
दरम्यान वैष्णवीच्या बाळाला आणण्यासाठी गेले असताना कस्पटे कुटुंबातील व्यक्तींना बंदुकीचा धाक दाखवून धमकावण्यात आलं होतं. निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीनं धमकी दिली होती, या निलेश चव्हाणला देखील सुपेकर यांनीच बंदुकीचं लायन्स दिल्याचंही दमानिया यांनी म्हटलं आहे. सुपेकर पाठिमागे होते म्हणूनच हगवणे कुटुंबानं आपल्या सुनांचा छळ केला. नाशिक कोल्हापूर असे सर्व कारागृह त्यांच्याकडे आहेत, जालिंदर सुपेकर यांनी कारागृहात जी खरेदी केली त्याच्यामध्येही त्यांनी 500 कोटी रुपयांचा घोटाळा आहे, अशा स्वरुपाचे गंभीर आरोप दमानिया यांनी यावेळी केले आहेत.