फडणवीसांमुळेच उदय सामंत महायुतीत, वैभव खेडकरांनी डिवचले, त्या दाव्याने शिंदे गोटात खळबळ
Vaibhav Khedkar on Uday Samant: मंत्री उदय सामंत हे फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असल्याचे चिमटा उद्धव सेनेकडून हमखास काढल्या जातो. पण आता भाजपच्या गोटातूनही उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गोटात खळबळ उडाली आहे. वैभव खेडकरांनी सामंतांना अशा प्रकारे डिवचले.

Vaibhav Khedkar on Uday Samant: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठेवलेल्या व्हॉट्सॲप स्टेस्टसवरून भाजप नेते वैभव खेडकरांनी यांनी त्यांना डिवचले आहे. गुवाहाटीच्या उठावामध्ये शेवटच्या क्षणाला फडणवीसांचा फोन आला नसता तर ते कदाचित या ठिकाणी नसते. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यामुळे ते आज महायुतीमध्ये आहेत. त्यांनी योग्य व्यक्तीचा हात धरलेला आहे. त्यांचं सूचक आणि योग्य असे हे स्टेटस आहे, असा चिमटा वैभव खेडकर यांनी सामंतांना काढला. सामंत हे शिंदे सेना फोडणार होते, असा दावा खासदार संजय राऊतांनी यापूर्वी केला होता. उद्धव सेनेतून सामंत हे भाजपच्या जवळचे नेते असल्याचे वारंवार डिवचले जाते. पण आता भाजपच्या गोटातूनच तीव्र हल्ला झाल्याने शिंदे गोटात खळबळ उडाली आहे.
वैभव खेडकरांनी नाडीच पकडली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती महाराष्ट्र गेल्यानंतर या महाराष्ट्राची प्रगती झाली. मंत्री उदय सामंतच नव्हे तर या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्राची धुरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहावे असं वाटतंय. मंत्री उदय सामंत असतील किंवा माझ्यासारखे तरुण नवीन कार्यकर्ता असेल त्यांनाही वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली काम करावे. भविष्यात ते अजून या ठिकाणी पुढे असतील, अशी अचूक नाडी वैभव खेडकर यांनी पकडल्याची राजकीय गोटात जोरदार चर्चा आहे.
उदय सामंत यांचे ते स्टेट्स काय?
उदय सामंत यांनी व्हॉट्सॲपवर एक स्टेस्टस ठेवले होते. या स्टेटसमध्ये योग्य लोकांचे हात हातात असतील, तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही, असे लिहिले होते. त्याची जोरदार चर्चा झाली. इंडिगो विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रवास केला. त्यावेळी त्यांच्यात हितगुज झाले. काल दोघेही एकाच प्रवासी विमानात होते. त्यानंतर सामंत यांचे स्टेटस चर्चेत आले.
का ठेवले स्टेटस
मंत्री उदय सामंत यांनी स्टेटसची चर्चा व्हावी म्हणूनच मी ते स्टेटस ठेवलं होतं, असं सांगितलं. शिंदे आणि फडणवीस यांच्यातलं बॉण्डिंग अतिशय विलक्षण आहे. त्यामुळे दुसरा विमानामध्ये बसला तरी त्यांचं बॉण्डिंग कमी होणार नाही. त्यांचं बॉण्डिंग राजकारणाच्या पलीकडे आहे. फडणवीस एका खिडकीकडे बसले होते तर उद्धव ठाकरे दुसर्या खिडकीकडे होते. त्यामुळे दोघांमध्ये चर्चा कशी होऊ शकते हे मला कळलं नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मधली सीट रिकामी ठेवली होती. त्यामुळे पुढचं उत्तर मिळावं म्हणून मी हा स्टेटस ठेवला होता, असा खुलासा मंत्री सामंत यांनी केला.
