Raj-Uddhav Thackeray Vijay Rally : कोणाची माय व्याली आहे त्याने मुंबईला हात घालून दाखवावं ! संतप्त राज ठाकरेंचं खुलं चँलेंज
महाराष्ट्र सरकारने शाळांमध्ये हिंदी सक्ती करण्याचा निर्णय मागे घेतल्यावर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेने वरळी येथे विजयी मेळावा आयोजित केला. राज ठाकरेंनी या मेळाव्यात राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला, हिंदी लादण्याचा प्रयत्न मुंबईच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात केलेला चाचपणीचा भाग असल्याचे म्हटले. त्यांनी सरकारला थेट आव्हान देत मुंबईला धोका निर्माण केल्यास त्यांचा तीव्र प्रतिसाद मिळेल असा इशारा दिला.

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या मुद्यावरून राज्य सरकारने माघार घेत जीआर रद्द केला. त्यानंतर मराठीचा, मराठी अस्मितेचा विजय असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आज वरळी डोममध्ये विजयी मेळावा घेण्यात आला. खचाखच भरलेल्या या सभागृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रथम भाषण करत राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ‘ सरकारने फक्त चाचपडून पाहिलं. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कुणाची माय व्यालीय त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवा, अशा खुल्या शब्दांत राज ठाकरेंनी थेट चॅलेंज दिलं. ‘ मुंबईला हात घालून दाखवा. मजाक वाटला का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत.’ अशा शब्दांत राज ठाकरेंनी कडाडून हल्ला चढवला.
मंत्र्यांचं हिंदी ऐका, फेफरं येईल
अनेक जण म्हणतात की ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, मग पुढे काय ? ते दादा भुसे मराठीत शिकले मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस मराठीत शिकले मंत्री झाले. याचा काय संबंध, ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. कुणाची मुलं परदेशात शिकतात त्याच्या याद्या आहेत. मंत्रिमंडळातील मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफरं येईल, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?
आम्ही मराठी मीडियात शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली. होय. मग यांना मराठीचा पुळका कसा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकली आहेत. या दोघांवर मराठीबाबत शंका घ्याल का ? असा रोख सवाल राज यांनी विचारला. लालकृष्ण आडवाणी सेंट पॅट्रीक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरीमध्ये शिकले. हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ते कॉन्व्हेंटमध्ये शिकले. दक्षिण भारतात बघा. त्यांना कोण विचारत नाही. उद्या हिब्रू भाषेत शिकेल आणि मराठीचा कडवट अभिमान बाळगेल. काय अडचण आहे? असंही राज ठाकरे म्हणाले.
तुम्हाला पुन्हा विभागतील
आज मराठी म्हणून एकत्र आला. महाराष्ट्रातील तमाम मराठी एकत्र आला आहे. याचं पुन्हा राजकारण तुम्हाला जातीत विभागतील. जातीचं कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही. जातीपातीत विभागायला सुरू करतील असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.