महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरवर आत्महत्या करण्याची वेळ, सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे असंवेदनशील वास्तव समोर
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हर्षल पाटील या कंत्राटदाराने जलजीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण केल्यानंतरही १.४ कोटी रुपयांची थकबाकी मिळाली नाही. यामुळे आर्थिक संकटात सापडून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्य सरकारवर तीव्र टीका होत आहे.

सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत काम केलेल्या एका तरुण कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केली आहे. हर्षल पाटील (३५) असे या मृत कंत्राटदाराचे नाव आहे. सरकारच्या विविध विभागांकडून सुमारे दीड कोटी रुपयांची बिले थकल्याने त्यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आव्हाड यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे. “सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या!” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट
“सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या!
हर्षल पाटील – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार. त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केलं.पण… काम झालं, बिलं दिली, पण बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत! त्याचे सरकारकडे ₹1.40 कोटी इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने ₹65 लाखांचं कर्ज काढलं… आणि शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं! पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आईवडील, आणि दोन लहान भाऊ…यांना ठेवून.
“लाडकी बहीण योजना” – एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाहीये.एकीकडे या योजनेसाठी सरकारनं कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला.राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला.दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांचं बिल अडवली गेली आहेत.कारण राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठी पैसेच नाहीयेत.
मी मागे म्हणालो होतो, “काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील…!” दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे.आज हर्षल पाटील गेलाय,पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील,याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही – तर प्रशासकीय अपयश देखील आहे! निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही – ती एक इशारा आहे.राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेणं गरजेचं आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचं असंवेदनशील वास्तव! हर्षल पाटील – वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या!
हर्षल पाटील – सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार.त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम… pic.twitter.com/pCYOzT1qcg
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 23, 2025
दरम्यान या घटनेमुळे राज्यभरातील कंत्राटदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारकडून यावर काय उपाययोजना केली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
