नारायण राणेंची अवस्था वृद्धाश्रमातील व्यक्तीसारखी, ते भाजपच्या… संजय राऊतांनी डिवचले
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर तीव्र टीका केली. राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला राऊतांनी "तीन वेळा दुकान बंद झालेले" म्हणून संबोधित केले.

“नारायण राणे आता भाजपच्या मेहरबानीवर जगत आहेत. त्यांचे दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं आहे. आता जसं एखाद्याला वृद्धाश्रमात टाकून जगवतात, तसं नारायण राणे कृत्रिम ऑक्सिजनवर जगत आहेत”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. यावेळी संजय राऊत यांनी नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीवर थेट हल्ला चढवला.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या राजकीय प्रवासावर जोरदार निशाणा साधला. “नारायण राणे यांनी आमच्या दुकानाबद्दल बोलू नये, कारण त्यांचे स्वतःचेच दुकान तीन वेळा बंद झाले आहे. ते शिवसेनेत होते, तेव्हा त्यांचे दुकान बंद झाले. त्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यावरही त्यांचे दुकान बंद झाले आणि आता ते भाजपमध्ये आहेत आणि फक्त त्यांच्या मेहरबानीवर जगत आहेत”, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
नारायण राणेंची अवस्था वृद्धाश्रमातील व्यक्तीसारखी
“नारायण राणे यांची अवस्था वृद्धाश्रमातील व्यक्तीसारखी झाली आहे. जसं एखाद्याला वृद्धाश्रमामध्ये टाकून जगवतात, तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवर जगत आहेत. त्यांनी आमच्या दुकान बंद करण्याची भाषा करू नये. 2029 च्या निवडणुकीत कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे. हे आपल्याला कळेलच. मी वारंवार सांगत आहे. नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे सगळे दहीहंडी वीर आहेत. नारायण राणे यांनी आपल्या वयाचे भान ठेवावं. आता त्यांनी जुनी भाषा करू नये. ती भाषा शिवसेनेमध्ये असताना शोभायची”, असेही संजय राऊतांनी म्हटले. यावेळी संजय राऊतांनी निवडणूक आयोगावरही टीका केली.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत?
“2024 च्या निवडणुकीमध्ये राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते, त्याबद्दल मी काल एक ट्विट केला आहे. 2024 साली जे निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांच्या सहकार्याने नरेंद्र मोदी आणि त्यांच्याबरोबर निवडणुका जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत, हा माझा पहिला प्रश्न आहे. तर जगदीश धनकड बेपत्ता झाले आहेत, तसे ते तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत”, असा सवाल संजय राऊतांनी केला.
जगदीश धनगड सुद्धा दिसत नाही
“राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यापासून खरं म्हणजे त्याचं उत्तर राजीव कुमार यांनी दिले पाहिजे. तेव्हा राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते, त्यांनी शिवसेना हे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला दिला गद्दारांना दिलं. घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटीचा व्यवहार झाला हे देखील मी सांगितलं. ते राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. मी त्याच्या संदर्भात सोशल मीडिया वरती माझा प्रश्न टाकला आहे. त्याच्यावर दिल्लीमध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे. जगदीश धनगड सुद्धा दिसत नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.
“राहुल गांधी यांनी हल्ला सुरू केल्यापासून आणि आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगावर हल्ला सुरु आहे. आता मत चोरी प्रकरणात 2024 पासून हे तेव्हा आयुक्तांना सुद्धा लोकांशी बोलण्यापासून मत व्यक्त करण्यापासून थांबवला आहे. कदाचित त्यांना दिल्लीतही आता ठेवलेले नाही”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
