खरंच देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे भेट झाली? संजय राऊतांनी सांगितली आतली गोष्ट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे, यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून, आता प्रचाराची देखील रणधुमाळी सुरू झाली आहे. याचदरम्यान राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची. या बातमीनं चर्चेला उधाण आलं आहे. अखेर यावर आता संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी ही बातमी फेटाळून लावली आहे. अशी कोणतीही भेट झाली नसून, चुकीची बातमी पसरवणाऱ्यांनी भाजपची सुपारी घेतल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यांनी हे भेटीचं वृत्त फेटाळून लावताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अशी कोणतीही भेट झाली नाही, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांनी भाजपची सुपारी घेतली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप उद्धव ठाकरे यांना घाबरत आहे. आमची लढाई ही महाराष्ट्राला लुटणाऱ्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्राला लुटणाऱ्या लोकांसोबत आमचं नाव जोडून ते आम्हाला भीती दाखवत आहेत. हा दावा खूप हास्यस्पद आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या बातमीमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. या बातमीमुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे, मात्र संजय राऊत यांनी अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.
जागा वाटपाचा तिढा
महायुतीमध्ये भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली, तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेकडून कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुरूच असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष जागा वाटप कधी जाहीर करणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.