पोलीस दलाचा आधारस्तंभ हरपला, गोल्ड मेडेल विजेता ‘सूर्या’चा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सातारा पोलीस दलातील सुवर्णपदक विजेता श्वान सूर्या यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. झारखंडमधील अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात त्याने एक्सप्लोसिव्ह युनिटमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या निधनाने सातारा पोलीस दलात आणि संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे.

सातारा पोलीस दलाची शान आणि देशाचे नाव उंचावणारा गोल्ड मेडेलिस्ट श्वान सूर्या याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सूर्याच्या अकाली निधनाने केवळ सातारा पोलीस दलातच नव्हे, तर संपूर्ण सातारा शहरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या निधनामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सातारा पोलीस दलाकडून कर्तव्यदक्ष सूर्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
अतुलनीय सेवेला सलाम
सूर्याचे पार्थिव पोलीस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. तेव्हा संपूर्ण परिसरात एकच शांतता पसरली होती. पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि सातारकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते. तसेच चेहऱ्यावर सूर्याला गमावल्याचे दुःख स्पष्ट दिसत होते. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सूर्याला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. यावेळी सातारा पोलीस दलाने सूर्याला मानवंदना दिली. या मानवंदनेने सूर्याने केलेल्या अतुलनीय सेवेला सलाम करण्यात आला.
पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
सूर्या केवळ एक श्वान नव्हता, तर तो सातारा पोलीस दलाचा एक अविभाज्य भाग होता. झारखंड राज्यातील रांची येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सूर्याने एक्सप्लोसिव्ह युनिटमध्ये सुवर्णपदक पटकावले. यामुळे महाराष्ट्र पोलीस आणि विशेषतः सातारा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत देशभरातील ४४ संघांनी भाग घेतला होता. या कडव्या स्पर्धेत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच सूर्याने सुवर्णपदक मिळवून जिल्ह्याचे आणि राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले होते. त्याची ही कामगिरी अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे.
पोलीस दलात एक मोठी पोकळी
सूर्याने आपल्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. स्फोटके शोधण्यापासून ते हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यापर्यंत, सूर्याने आपल्या कौशल्याने पोलिसांना मोठी मदत केली होती. त्याच्यामुळे अनेकवेळा धोके टाळले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाचे योगदान दिले होते. त्याच्या निधनामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
