शरद पवारांनी सुचवलेला पर्याय चुकीचा, घटनातज्ज्ञाचा दावा, मग मराठा समजाला आरक्षण मिळणार तरी कसे?
जरांगे सध्या मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय परत जणार नाही. एक तर मी मरून जाईल किंवा आरक्षण मिळेल, असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, जरांगे यांच्या याच भूमिकेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मराठा समाजात सरसकट मागासलेपण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil Mumbai Protest : सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांच्याकडून केली जात आहे. याच मागणीला घेऊन जरांगे सध्या मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसलेले आहेत. काहीही झालं तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय परत जणार नाही. एक तर मी मरून जाईल किंवा आरक्षण मिळेल, असा निर्धारच त्यांनी बोलून दाखवलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, जरांगे यांच्या याच भूमिकेवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मराठा समाजात सरसकट मागासलेपण नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण गेल्यास…
मनोज जरांगे यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन सामोपचाराने यावर तोडगा काढण्याची गरज आहे, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी कायद्याने घालून दिलेल्या 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचाही उल्लेख केला आहे. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येत नाही. घटनादुरुस्ती करून 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण दिल्यास त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असा कायदेशीर पेच उल्हास बापट यांनी सांगितला. तसेच राज्य सरकारने आता कुठला कायदा केला तर घटनात्मकदृष्ट्या तो टिकणार नाही, हेही बापट यांनी रोखठोकपणे सांगितले.
शरद पवार यांनी सुचवलेला पर्याय चुकीचा
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी. यात केंद्र सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकते. वेळप्रसंग घटनादुरुस्तीही करावी लागेल, असे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले होते. यावर बोलताना शरद पवार यांनी सुचवलेला पर्याय चुकीचा आहे. पवार राजकीय भूमिका मांडत आहेत. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण देता येत नाही. ते दिले तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते असे म्हणत त्यांनी शरद पवारांचे मराठा आरक्षणविषयक मत चुकीचे असल्याचे सांगितले.
ओबीसी संघटना आक्रमक होण्याची शक्यता
दरम्यान, मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे, अशी थेट भूमिका घेतली आहे. पण सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिले जाऊ शकते का? ते कायद्यात टिकणार का? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. तसेच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केला तर ओबीसींचे आरक्षण घेणारे आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
