हा महाराष्ट्र अदानी, अंबानीने निर्माण केला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
शेकापच्या मेळाव्यात शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप सरकारवर आणि अदानी-अंबानींवर टीका केली. महाराष्ट्राच्या विकासात शेतकरी आणि कामगारांच्या योगदानावर भर देत, त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर चिंता व्यक्त केली. राऊत यांनी शेकाप आणि शिवसेनेच्या एकत्रित संघर्षाचा इतिहास सांगितला आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यांनी 'अर्बन नक्षलवाद' चा मुद्दा उपस्थित करून सरकारच्या दडपशाहीला आव्हान दिले.

एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व शेकाप नेत्याने केलं. महाराष्ट्राला यशवंतराव मोहितेंच्या रुपाने शेकापने उत्तम अर्थ मंत्री दिला. या राज्यात शेतकरी आणि कामगार दोघेही संकटात आहे. हा महाराष्ट्र अदानीने निर्माण केला नाही. अंबानीने निर्माण केला नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हल्ला चढवला. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान भाषण देताना संजय राऊत यांनी शेकाप व त्यांच्या कष्टांबद्दल बोलतानाच आजच्या महायुती सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
काय म्हणाले संजय राऊत ?
शेकापच्या या मेळाव्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, तसेच शशिकांत शिंदे व शेकापच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी राऊत यांनी विविध विषयांना हात घालत खणखणीत भाषण केलं. स, “आम्ही सर्व इथे आलो आहोत ती शेकापची पुण्याई आहे. महाराष्ट्राच्या मातीत गेल्या ७८ वर्षापासून शेतकरी, कष्टकरी यांच्या संदर्भात पक्षाने घेतलेल्या भूमिका आणि संघर्ष. दोन पक्ष या राज्यात आहेत. एक शेकाप आणि शिवसेना. यांना संघर्ष केल्याशिवाय काही मिळालं नाही. वाट्याला बरे दिवस येत आहेत असं वाटत असतानाच कोणी तरी येतं आणि तुकडे करून जातं ” असं राऊत म्हणाले.
म्हणून फडणवीस यांना हा महाराष्ट्र भोगता येतो..
महाराष्ट्राच्या जडणघडणतीली शेकापच्या योगदानाबद्दलही राऊत बोलले. ” शेकाप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पहिल्यापासून फाटके. दोन्ही पक्षाने मराठी माणसाच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले. हे फोटो लावले आहेत, ते आमचे हिरो होते. राजकारणात आणि समाजकारणात आम्ही जे शिकलो त्यात शेकापने निर्माण केलेलं नेतृत्व होतं. एकेकाळी या महाराष्ट्राचं नेतृत्व शेकाप नेत्याने केलं. महाराष्ट्राला यशवंतराव मोहितेंच्या रुपाने शेकापने उत्तम अर्थ मंत्री दिला. या राज्यात शेतकरी आणि कामगार दोघेही संकटात आहे. हा महाराष्ट्र अदानीने निर्माण केला नाही. अंबानीने निर्माण केला नाही. फडणवीस यांच्या पूर्वजांनी निर्माण केला नाही. मुंबईसह महाराष्ट्र झाला तो फक्त गिरणी कामगार आणि शेतकऱ्यांनी केला. त्यात लालबावटा सर्वात पुढे होता. हा लाल बावटा स्वातंत्र्याच्या लढ्यात होता. स्वातंत्र्य लढ्यात भाजप नव्हता. आरएसएस नव्हती. कोणी नव्हतं ” असं राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या लढ्यात डांगे, अण्णाभाऊ साठे, अमरशेख, अहिल्या रांगणेकर, एनडीपाटील होते. शेतकरी हा महाराष्ट्राच्या लढ्यात होता. म्हणून फडणवीस यांना हा महाराष्ट्र भोगता येतं, असा टोलाही राऊतांनी लगावला.
मी रायगड जिल्ह्यातील आहे. ज्या जिल्ह्यात हा पक्ष सर्वाधिक रुजला. त्या जिल्ह्यात माझा जन्म झाला. त्या तालुक्यात शिक्षण झालं. मी अजूनही गावाला जातो. शेकाप आणि त्यांचे कार्यकर्ते आणि मी सर्वांची माहिती घेत असतो. तालुक्यात शेकापचं काय चाललंय? ही माहिती घेत असतो. हा शेतकरी आणि कामगार आहे, जोपर्यंत राज्यात टिकवून टेवू. तोपर्यंत महाराष्ट्र हातात राहील, सरकारला ते नको आहे अशी टीका राऊतांनी केली. गेल्या पाच महिन्यात राज्यात 550 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. काय करतोय आपण. आम्ही आवाज उठवतो. पण आवाज बंद केला जातो.
अर्बन नक्षलवाद म्हणजे काय ?
आता हातात लाल बावटा घेतला की तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकलं जाईल. तुम्ही सरकारविरोधी बोलला तर तुम्हाला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकून दिलं जाईल. अर्बन नक्षवलवाद. काय असतो अर्बन नक्षलवाद? मी देशात फिरतो. खेड्यापाड्यात काम करणारा, आदिवासी कार्यकर्ता हा कॉम्रेड आहे. त्याला नक्षलवादी ठरवून तुरुंगात टाकता. उद्या शेकापच्या कार्यकर्त्यांवर ही वेळ येऊ शकतो. तुम्ही कष्टकऱ्यांबद्दल आवाज उठवता तुम्ही नक्षलवादी आहात. तुम्ही सावध राहा असा इशारा राऊतांनी दिला.
आपण सावध राहिला पाहिजे, या महाराष्ट्राचं राजकारण मराठी माणसाच्या हातातच राहिलं पाहिजे यासाठी सजग असलं पाहिजे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले. दोन्ही नेते एकत्र येऊन चालणार नाही. त्यांच्यासोबत सर्व कामगार शेतकरी संघटना एकत्र आलं पाहिजे. शेकापला यश मिळालं नाही. शिवसेनेला यश मिळालं नाही. राष्ट्रवादीला यश मिळालं नाही. त्यामुळे खचून जाऊ नका. पुढच्या लढाईला तयार राहिलं पाहिजे. खचून कसले जाता. राज्याचं नेतृत्व हातात घेण्यासाठी कंबर कसून राहिलं पाहिजे असं आवाहनही राऊतांनी केलं.
