106 हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नव्हे, तुम्ही मुंबई ओरबडायला…. निशिकांत दुबेंच्या विधानावर संजय राऊत संतापले
भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या मुंबईच्या निर्मितीतील हिंदी भाषिकांच्या योगदानाबाबतच्या वादग्रस्त विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. दुबे यांनी हिंदी बोलण्याबाबतच्या अडचणीचाही उल्लेख केला होता. राऊत यांनी दुबेंच्या विधानाला खोचक प्रतिक्रिया दिली,

“मुंबई, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान राहिले आहे. आजही आम्ही तितकेच योगदान देतो”, असे वादग्रस्त विधान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “तुम्ही मुंबईत पैसे कमवायला आलात ना, तुम्ही घाम गाळायला आलात म्हणजे मुंबई ओरबडायला आलात, तुमच्या राज्यात नोकरी उद्योग धंदा नसल्याने मुंबईत आलात. नाहीतर तुम्ही कशाला याल”, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.ॉ
संजय राऊतांची प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निशिकांत दुबे यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य करत निशिकांत दुबेंवर घणाघात केला. “तुम्ही एखाद्या व्यक्तीला फार महत्त्व देत आहात. जो महाराष्ट्राच्या विरोधात मराठी माणसाच्या विरुद्ध बोलत आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक प्रकारे त्याचं समर्थन करत आहेत. आपण सर्वांनी दिल्लीतील लोकांनी या प्रवृत्तीला खतपाणी घालू नये. हा महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेचा विषय आहे. असे अनेक दुबे आले आणि गेले”, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई भव्य निर्माण करण्यासाठी आलेला नाहीत
“मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे. १०६ हुतात्मांच्या बलिदानातून ही मुंबई आपल्याला महाराष्ट्रासह मिळालेली आहे. ते १०६ हुतात्मे दुबे, चौबे, मिश्रा नाहीत. हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे. छातीचा कोट करुन महाराष्ट्र लढला, मराठी माणूस लढला, गिरणी कामगार लढला तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मिळाली. तुम्ही मुंबईत पैसे कमवायला आलात ना, तुम्ही घाम गाळायला आलात म्हणजे मुंबई ओरबडायला आलात, तुमच्या राज्यात नोकरी उद्योग धंदा नसल्याने मुंबईत आलात. नाहीतर तुम्ही कशाला याल. आपण इकडचे पैसे बाहेरच आपल्या राज्यात घेऊन जात आहोत, हे समजायला हवं. मराठी माणसाच्या पोटावर मारुन तुम्ही ही मुंबई लुटत आहात, हे देखील तितकंच खरं आहे. आपण काय मुंबई भव्य निर्माण करण्यासाठी आलेला नाहीत”, असेही संजय राऊतांनी सांगितले.
निशिकांत दुबे नेमकं काय म्हणालेले?
निशिकांत दुबे यांनी नुकतंच एका चॅनलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना मराठी विरुद्ध हिंदी वादावरुन विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. “मला असे वाटते की मुंबई, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उत्तरप्रदेश, बिहार आणि हिंदी भाषिक लोकांचे मोठे योगदान राहिले आहे. आजही तुमच्या अर्थकारणात आम्ही देखील तितकेच योगदान देतो. फक्त आम्हीच यासाठी योगदान देतो असं आम्ही म्हणत नाही. पण आम्हीदेखील तितकेच योगदान देतो, मग तुम्ही आम्हाला कशाच्या आधारावर मारहाण करता”, असा सवाल निशिकांत दुबे यांनी केला. “तसेच इंग्रजी बोलायला कोणालीही अडचण नाही. पण हिंदी बोलण्याला आहे. इंग्रज जेव्हा इथे आले असतील तेव्हा त्यानंतर इंग्रजी बोलण्यास सुरुवात झाली असेल त्यापूर्वी कोणीही इंग्रजीत बोलत नव्हते”, असेही निशिकांत दुबे म्हणाले होते.
