…तर आम्ही भाजपाशी चर्चा करू, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर पहिल्यांदाच सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून जशी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू आहे, त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार असल्याचं देखील बोललं जात आहे, यावर आता सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे, पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोबतच दोन्ही राष्ट्रवादीचे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट देखील एकत्र येणार का? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले तटकरे?
दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा कोठेही झालेली नाही, चर्चा सुरू नाही, आम्ही आता एनडीएमध्ये राहणार आहोत. आज काहीही विषय नाही. मात्र तसा काही विषय झाला तर भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करू, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेत आमचा दारूण पराभव झाला होता. मात्र त्यानंतर लाडक्या बहीण योजनेसह विविध योजनाच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झालो, आणि महायुतीला विधानसभेत अभूतपूर्व यश मिळालं. वेगवेगळ्या मनपा व जिल्हा परिषद स्थरावर दौरे सुरू आहेत. स्थानिक नेत्याकडून त्या त्या भागाची परिस्थिती जाणून घेतली जात आहे. पुढे निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस एकटा निर्णय घेणार नाही, हा निर्णय एकट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते निवडणुकीबाबत निर्णय घेतील असं तटकरे यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यभरात झालेल्या विरोधानंतर सरकारनं त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केले, यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपण बहुभाषिक आहोत, आपण हिंदीपण बोलत आलो, इंग्लिश पण बोलतो, जर विधेयक वाचलं तर हेतू कळेल, असं तटकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे बोलत होते. दरम्यान हिंदी विरोधात काही दिवसांपूर्वी मनसेनं मोठं आंदोलन उभारल्याचं पाहायला मिळालं होतं.
