आधी पुडी सोडतात नंतर… आपलं सरकार…उद्धव ठाकरेंनी महायुतीला घेरलं!
उद्धव ठाकरे यांनी कोली बांधवांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सडकून टीका केली.

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील कोळी बांधवांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल केला. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून ते दत्तात्रय भरणे यांना देण्यात आलंय. यावरही ठाकरेंनी शेलक्या शब्दांत टीका केली. विशेष म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा उल्लेख करून त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहून मला आनंद होतो. अजूनही आपल्याला पूर्ण विजय मिळाला नाही. सरकारची नेहमीच चाल असते. आधी पुडी सोडतात, थोडक्यात पिल्लू सोडतात. जगतं की मरतं ते पाहतात. त्यानंतर आंदोलनात उतरलेल्यांना वाटतं आपण जिंकतो. आपण गाफिल राहिलो की ते पोखरत राहतात, अशी टीका ठाकरे यांनी केली.
रमी या खेळाला, उद्धव ठाकरेंचा टोला
पुढे बोलताना त्यांना त्यांनी माणिकराव कोकाटे यांना मिळालेल्या क्रीडा खात्यावरही टोला लागवला आहे. तुमच्यासमोर येण्याच्या आधी मी काही लोकांना बोलावलं होतं. तिथे म्हटलं की, सरकार टिकवण्यासाठी कुणाला तरी मंत्रिपद दिलं जातं. आज पहिल्यांदाच एका व्यक्तीला त्याच्या आवडीचं खातं दिलं. आता रमी या खेळाला दर्जा मिळणार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
कोळी बांधवांचा पाठिंबा कायम असू द्या
पुढे बोलताना ते कोळी बांधवांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही माझ्यासोबत आले आहात. आता शिवसेना तुमच्यासोबत आहे. तुम्हीच शिवसेना आहात. तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. तसेच बोलताना त्यांनी कोळी बांधवांचा पाठिंबा कायम असू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. अन्यायावर तुटून पडा, असं शिवसेना प्रमुख म्हणाले होते. मी म्हणतो अन्याय तोडून टाका. अन्याय सहन करायचाच नाही, असंही ते कोळी बांधवांना उद्देसून म्हणाले. मला हा विषय आदित्यने नीट समजावून सांगितला. सरकार एका बाजूला सांगतंय भाडं भरू. भाडं घेतलं पण ज्याला द्यायचं ते दिलंच नाही. मधल्या मध्ये कुणी खाल्ले पैसे, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीवर भाष्य केलं. करोनाकाळ वाईट होता. तो जागतिक संकटाचा काळ होता. जे करायचं ते केलं. पण बऱ्याच गोष्टी केल्या नाही. आज आपलं सरकार असतं तर तुमच्यावर लढण्याची वेळ आली नसती. शिवसेनेची स्थापना भूमिपुत्रांसाठीच झाली आहे, अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
