Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले, अमित शाहांनाच थेट आव्हान, म्हणाले तुम्ही मुंबईत…
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपावर सडकून टीका केली. सोबतच त्यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते अमित शाह यांनाही थेट आव्हान दिले आहे. भाजपा याला काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेआहे.

Uddhav Thackeray Speech : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या निर्धार मेळाव्यात जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी भाजपा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लक्षात घेता त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना निवडणुकीसाठी नेमके काय काय करायला हवे? याबाबत सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाहा यांच्यावरही हल्लाबोल केला. तुम्ही मुंबईत येऊन गेले. पण मी मुंबई भगवी केल्याशिवाय राहणार नाही, असे थेट आव्हानच ठाकरे यांनी अमित शाहांना दिले.
डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही
भाषणाच्या शेवटी बोलताना ठाकरे यांनी अमित शाहा यांच्यावर भाष्य केले. अमित शाहांना मी आव्हान देतो. तुम्ही मुंबईत येऊन गेले. निवडणुकीनंतर मुंबई भगवी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करायचे ते करा, कितीही डोकं आपटा. डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच शिवरायाच्या मावळ्याला कुणी डिवचायचे नाही. डिवचलं तर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिला आहे. त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे म्हणत भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आम्हीच मुंबई पालिकेची निवडणूक जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खुल्या मैदानात या, नामर्द असाल तर…
भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष नाही. भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे. देशप्रेमी असल्याचे स्वत: जाहीर करतात. त्यांना आत्मनिर्भर भारत करता येत नाही. त्यांना मतं चोरावी लागतात. पक्ष फोडावे लागतात. हे कसले आत्मनिर्भर, अशी जळजळीत टीका ठाकरेंनी भाजपावर केली. तसेच खुल्या मैदानात या. नामर्द असाल तर मतचोरी करून या. भाजपने ठरवावं आम्ही मर्दाची औलाद आहोत की नाही. तुम्ही नामर्दाची औलाद आहात. म्हणून पक्ष फोडावे लागतात. मतचोरी करतात, असे टीकास्त्र ठाकरेंनी डागले. आता ठाकरेंच्या या आरोपांना भाजपा नेमके काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
