अजितदादा सध्या स्वर्गात आहेत, मजा घेत आहेत, वसंत मोरे यांचा खोचक टोला
मी मनसेत होतो तेव्हा राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिक म्हणून बॅच सर्वांच्या छातीला लावला. तो पहिला बॅच माझ्या छातीलाही लागला होता. तो बॅच माझ्या छातीला लावल्यावर मी तो देव्हाऱ्यात ठेवला होता. जेव्हा पक्ष सोडला, तेव्हा मी बॅच पक्षाकडे दिला. तो बॅचही मला प्रेरणादायी होता, असं ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नरकातला स्वर्ग या खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकावरून खोचक टोला लगावला होता. मला नरकाबाबत काही माहीत नाही, स्वर्गाबाबत काय विचारायचं ते विचारा, असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सध्या अजित पवार स्वर्गात आहेत, म्हणजे सत्तेत आहेत. ते नरकात होते, आता स्वर्गात गेले. स्वर्गाची मजा घेत आहेत, असा खोचक टोला वसंत मोरे यांनी लगावला.
ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी खासदार संजय राऊत यांचं नरकातला स्वर्ग हे पुस्तक देव्हाऱ्यात ठेवलं आहे. त्याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. आपण देव्हाऱ्यात देव ठेवतो, कारण देवापासून प्रेरणा मिळते. जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा आपण देवाचा धावा करतो. मला वाटतं की, हे पुस्तक आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. अडचणीत येणाऱ्या प्रत्येक राजकारण्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. मी जी काही 40 पानं वाचली त्यातून मला प्रचंड प्रेरणा मिळाली. मुळापासून काय आहे ते या पुस्तकात आहे. उद्धव साहेब जसं म्हणाले, हे पुस्तक रडगाणं नाहीये. तर मी कसा वाद घातला, मी कसा संघर्ष केला. ईडी वगैरे संस्थांच्या विरोधात मी कसा उभं राहिलो, हे या पुस्तकात नमूद आहे, असं वसंत मोरे म्हणाले.
दिल्लीवरून येणारी प्रत्येक संस्था ही काय आपली मालक नसते. राऊत साहेबांचा फोन काढून घेण्यापर्यंत विषय आला तेव्हा राऊत साहेबांनी ठणकावून सांगितलं की तुम्ही मला अटक केलेली नाही. त्यामुळे तुम्ही माझा फोन काढून घेऊ शकत नाही. हे सर्व सुरू असताना राऊत साहेबांनी चार ट्विट केले. तेव्हा पत्रकार आणि शिवसैनिक जमा झाले. सर्व बातम्या सुरू झाल्यावर दिल्लीतून ईडीवाल्यांना फोन आला आणि त्यांचा फोन काढायला सांगितलं. पण त्यांनी शेवटपर्यंत फोन दिला नाही, असं सांगतानाच सत्तेमधील लोक जेव्हा अडचणीत आणतात तेव्हा त्यांच्यासमोर गुडघे न टेकता कशाप्रकारे ठाण मांडून उभं राहायचं हे या पुस्तकात आहेत, असं मोरे यांनी सांगितलं.
इतिहास पुसायचा नसतो
या पुस्तकावर भाजपकडून टीका होत आहे. त्याचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. हे पुस्तक वाचण्याची गरज भाजपला आहे. जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा भाजपची गुजरातमध्ये सत्ता होती. तेव्हा काँग्रेसच्या सरकारकडून त्यांना कशा प्रकारे अडचणीत आणलं हे या पुस्तकातून कळतं. त्यावेळी जर वाजपेयींनी स्वत: मोदींना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हायला सांगितलं होतं. पण बाळासाहेबांनी मोदींना वाचवलं. हा इतिहास आहे आणि इतिहास कधी पुसायचा नसतो, असा चिमटा त्यांनी काढला.
फडणवीस यांना पुस्तक देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालसाहित्य वाचत नाही, असं म्हणत राऊत यांच्या पुस्तकाची अवहेलना केली. त्यावरही मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बालसाहित्य कदाचित त्यांनी वाचलं नाही. त्यामुळे बालसाहित्य आहे की स्फूर्ती देणारं साहित्य आहे हे त्यांना कसं कळणार? मी फडणवीस यांना पुस्तक पाठवणार आहे. भाजपच्या ज्या ज्या नेत्यांना पुस्तक मिळालं नसेल त्यांना हे पुस्तक देणार. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनाही पुस्तक देणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
शिवसैनिकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे
ज्या गोष्टीतून प्रेरणा मिळते, त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. पुण्यातील महापालिकेच्या निवडणुकात आहेत. दोन उपमुख्यमंत्री आणि 100 नगरसेवकांच्या फौजे विरोधात लढायचं आहे. विरोधी पक्ष म्हणून शहरात उभं राहायचं असेल तर माझ्या प्रत्येक शिवसैनिकांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
