प्रियांका गांधी 'हुकमाची राणी', शिवसेनेकडून कौतुक

मुंबई : प्रियांकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून आज प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणात उतरण्याचं कौतुक करत स्वागत करण्यात आले आहे. ‘हुकमाची राणी’ या मथळ्याखाली ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहिण्यात आला असून, यात प्रियांका गांधी यांचे भरभरुन कौतुक करण्यात …

प्रियांका गांधी 'हुकमाची राणी', शिवसेनेकडून कौतुक

मुंबई : प्रियांकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून आज प्रियांका गांधी यांच्या सक्रीय राजकारणात उतरण्याचं कौतुक करत स्वागत करण्यात आले आहे. ‘हुकमाची राणी’ या मथळ्याखाली ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहिण्यात आला असून, यात प्रियांका गांधी यांचे भरभरुन कौतुक करण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांच्यासमोर आव्हानं असतानाही, त्या राजकारणात उतरल्याचेही अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच, प्रियांका गांधी यांची तुलना भारताच्या माजी पंतप्रधान ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांच्याशी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचेही कौतुक यातून केले आहे.

प्रियांका गांधी ‘हुकमाची राणी’

“प्रियंका गांधी या इंदिरा गांधींचे हुबेहूब रूप आहेत व त्यांच्या वागण्या–बोलण्यात ती झलक दिसते. त्यामुळे हिंदी भाषिक पट्टय़ात काँगेसला नक्कीच उभारी येईल. प्रियंका गांधी राजकारणात आल्याने रॉबर्ट वढेरांची दडपलेली प्रकरणे वेगात बाहेर येतील ही भीती असतानाही प्रियंकाने मैदानात उडी मारली. आम्ही बचावात्मक नव्हे तर आक्रमक राजकारणावर भर देणार आहोत. त्यासाठीच प्रियंकावर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे राहुल गांधी यांनी लपवाछपवी न करता सांगितले. राहुल गांधींनी उत्तम डाव टाकला आहे. प्रियंकाची तोफ धडाडली व तिच्या सभांना गर्दी झाली तर ही बाई इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल.”

“राहुल गांधींमुळे मृतवत काँग्रेसला संजीवनी”

“राहुल गांधी अपयशी ठरले म्हणून प्रियंकाला आणावे लागले अशा वावडय़ा उठवल्या जात आहेत. त्यात दम नाही. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ‘राफेल’सारख्या विषयावर त्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे. हे एकवेळ सोडा, पण तीन महत्त्वाच्या राज्यांत काँग्रेसने भाजपकडून सत्ता खेचून घेतली व त्यामुळे मृतवत काँग्रेसला संजीवनी मिळाली. त्याचे श्रेय त्यांना न देणे हे कोत्या वृत्तीचे लक्षण आहे.”

“घराण्याचा वारसा लोकांनी स्वीकारला असेल, तर पोटात का दुखतं?”

“काही लोकांसाठी कुटुंब हाच पक्ष आहे, असे श्री. मोदी यांनी म्हटले आहे. काही ठिकाणी गटाचे किंवा स्वतःच्या टोळीचे राजकारण केले जाते व त्यांचा परिवार असतो तर काही ठिकाणी ‘घराणी’ राजकारण करतात. या घराण्यांचा वारसा लोकांनी स्वीकारला असेल तर त्यात इतरांच्या पोटात दुखायचे कारण काय? राजकारणात व सत्तेत असेही अनेकजण वर्षानुवर्षे गुळास मुंगळा चिकटावा तसे चिकटून बसलेच आहेत व हेसुद्धा घराणेशाहीपेक्षा वेगळे नाही.”

प्रियांका गांधी सक्रीय राजकारणात

प्रियांका गांधी यांनी पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी घेत, सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या कुटुंबाने आपलं आयुष्य भारतीय राजकारण आणि समाजकारणात घालवलं, त्या गांधी कुटुंबातील आणखी एक व्यक्ती राजकारणात आल्याने अनेकांनी टीकाही केली. मात्र, मोठ्या संख्येत प्रियांका यांचे स्वागतही झाले. इंदिरा गांधी यांच्यासारखं दिसणं, वागणं, बोलणं असणाऱ्या प्रियांकांमध्ये लोक इंदिरा गांधी यांना शोधू लागले आहेत. गांधी-नेहरु कुटुंबाचं वलय प्रियांका यांच्या मागे असलं, तरी येणाऱ्या काळात त्यांना त्यांचं नेतृत्त्व सिद्ध करावे लागणार आहे.

कोण आहेत प्रियांका गांधी?

प्रियांका गांधी या भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची नात, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कन्या आहेत. प्रियांका यांच्या आई म्हणजे सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत, तर भाऊ राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

गांधी कुटुंब भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच राजकारण आणि समाजकारणात सक्रीय राहिलं आहे. प्रियांका गांधी यांच्या आजीचे वडील म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल योगदान दिलं, तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताची घडी बसवण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आता याच कुटुंबातील नवी पिढी म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या राजकारणात सक्रीय झाले आहेत.

नेहरु-गांधी कुटुंबाने भारताच्या जडण-घडणीत मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे याच कुटुंबातील प्रियांका गांधी यांच्या कामगिरीकडे आणि वाटचालीकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.

संबंधित बतम्या :

प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय, पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी वर्णी

‘प्रियांका राजकारणात येईल, तेव्हा लोक मला विसरतील’

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांची लव्ह स्टोरी

सोनिया गांधी नव्हे, आता रायबरेलीतून प्रियांका गांधी लढणार?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *