‘निवडणूक आयोगाला, राहुल गांधी बदनाम करतायेत’, न्यायमूर्तींसह सनदी अधिकारी मैदानात, 272 जणांचे खुले पत्र
Rahul Gandhi, Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 लोक मैदानात उतरले आहेत. यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी (यामध्ये 14 राजदूत) आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या सर्वांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे.

272 Bureaucrats Open Letter: काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल थांबलेला नाही. त्यांनी या वर्षात तीनही अधिक पत्रकार परिषद घेऊन देशात मतचोरी होत असल्याचा आरोप केला. त्यासाठी त्यांनी काही मतदारसंघातील उदाहरणं समोर आणली. काँग्रेसकडून सातत्याने निवडणूक आयोगावर हल्लाबोल होत असताना आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ 272 दिग्गज मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये 16 न्यायमूर्ती, 123 निवृत्त सनदी अधिकारी (यामध्ये 14 राजदूतांचाही समावेश आहे) आणि 133 सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांनी काँग्रेसविरोधात खुले पत्र लिहिले आहे.
निवडणूक आयोगाला काँग्रेस बदनाम करतंय
निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ हे पत्र लिहिण्यात आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाला बदनाम करत असल्याचा आरोप या 272 दिग्गजांनी लावला आहे. त्यांनी या पत्रात काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवला आहे.
काय आहे या पत्रात?
या खुल्या पत्रात निवडणूक आयोगाविरोधातील कथित आरोपांची निंदा करण्यात आली आहे. आम्ही समाजातील ज्येष्ठ नागरिक या बाबतीत चिंता व्यक्त करतो की, भारतीय लोकशाहीवर बळाचा उपयोग नाही तर, तिच्या अनेक आधारभूत संस्थांविरोधात घातक वक्तव्य करून हल्ला करण्यात येत आहे. काही नेते हे नाटक वठवत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत असे या पत्रात म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निष्ठेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला
या पत्रानुसार, कधी भारतीय लष्कराच्या शौर्यावर तर त्यांच्या साहसावर प्रश्न उठवण्यात आले. कधी न्यायपालिकांवर, संसदेवर आणि तिथे काम करणाऱ्यांवर सवाल करण्यात आले. आता त्यांच्या टार्गेटवर निवडणूक आयोग आहे. आयोगाच्या निष्ठेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला करण्यात येत आहे. या पत्रात राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते वारंवार निवडणूक आयोगावर हल्ला चढवत आहेत. निवडणूक आयोग मत चोरी करणाऱ्यांसोबत असल्याविषयीचे ठोस पुरावे पण असल्याचा त्यांचा दावा आहे. याविषयी त्यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. गांधी यांनी देशातील निवडणूक मत चोरी झाल्याचा आरोप केला आहे. तर त्यांच्या हायड्रोजन बॉम्बची अजूनही देशवासियांना प्रतिक्षा आहे.
