आता मी राहुलची झाले… जावयासोबत पळून गेलेल्या सासूचा ठाम निश्चय, घरच्यांनी 5 तास समजावलं तरी…
अलीगढमधील जावयासोबत पळून गेलेली सासू आता त्याला सोडायला तयार नाही. आता तिला फक्त त्याच्यासोबत राहायचे आहे. तिच्या कुटुंबाने तिला पोलिस स्टेशनमध्ये पाच तास समजावण्याचा प्रयत्न केला, पण आता राहुलच आपला नवा जीवनसाथी असेल असे सांगत सासू आपल्या निर्णयावर ठाम आहे. राहुलशी लग्न करून नवीन संसार मांडेन असं तिचं म्हणणं आहे.

“ मी आता तुमच्यासोबत राहणार नाही. मी जावयालाच माझ्या जीवनाचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. आता त्याच्यासोबत राहूनच पुढचं आयुष्य घालवणार ” हे वक्तव्य आहे सासूबाई अपना देवी याचं. खरंतर सासू-जावयाचं हे अनोखं नातं नव्या वळणावर पोहोचलं आहे. अलीगढच्या मडराक पोलिस स्टेशनमध्ये अपना देवीच्या कुटुंबियांनी तिला 5 तास समजवण्याचा प्रयत्न केला, पण मला आता पती जितेंद्रसोबत नव्हे तर जावई राहुलसोबतच रहायचं आहे, तोच माझ्या जीवनातील नवा जोडीदार असेल . हाच माझा अखेरचा निर्णय असेल असे सांगत अपना देवी या त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. माझ्याबद्दल विचार करण्यापेक्षा तु्म्ही तुमच्या घरी निघून जा, मी आता जितेंद्र (पतीच्या) घराचा उंबरठाही ओलांडणार नाही, असं जावयासोबत पळालेल्या सासूने सांगितलं असून त्यांचा हा निश्चित निर्णय आहे.
सासू आणि जावयाच्या या कथेचा आजचा 11वा दिवस आहे. या 11 दिवसांत सोशल मीडियावर या दोघांची सर्वाधिक चर्चा झाली. ही कहाणी 7 एप्रिल रोजी सुरू झाली, जेव्हा सासू, अपना देवी, ही तिच्या भावी जावयासह घरातून पळून गेली. जेव्हा ही घटना उघडकीस आली,तेव्हा मीडियात भरपूर चर्चा झाली. रोज त्यात नवे ट्विस्ट आले, पण पोलिसांना दोघांनाही पकडता आलं नाही. शेवटी राहुल आणि त्याच्या सासूबाई अपना देवी यांनी मद्रक पोलिस स्टेशनला जाऊन सरेंडर केलं.
खरं तर, दादोन पोलिस स्टेशन परिसरातील मचरिया नागला येथील रहिवासी राहुलचे लग्न मद्रक पोलिस स्टेशन परिसरातील मोहनपूर कायस्थ गावातील रहिवासी शिवानीशी ठरलं होतं. पण लग्नाच्या 10 दिवस आधी, शिवानीला कळलं की तिची आई अपना देवी तिचा होणारा नवरा राहुलसोबत घरातून पळून गेली. ते ऐकून तिला मोठा धक्का बसला. आईच्या या कृत्यामुळे शिवानी रडू लागली. तिची वाईट अवस्था झाली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान, तिचे वडील आणि अपना देवीचा पती जितेंद्र दादोन पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
16 एप्रिलला सासू-जावयाने केले सरेंडर
मोहनपुरा गावातील अपना देवीच्या कुटुंबाला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनीही मद्रक पोलीस स्टेशन गाठले आणि अपना देवीच्या बेपत्ता होण्याचा अहवाल नोंदवला. बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवल्यानंतर, पोलिसांनी सासू आणि जावई राहुलचा शोध सुरू केला. कधीकधी त्यांचे स्थान उत्तराखंडमध्ये आढळले तर कधीकधी ते गुजरातमध्ये दिसल्याची माहिती समोर आली. पोलिसही हैराण झाले, 9 दिवस लपाछुपीचा खेळ झाल्यावर अखेर 16 एप्रिलला सासू आणि जावई स्वत:च पोलिसांसमोर शरण आले.
शेरवानी खरेदी करणार होता, पण सासूसोबत पळून गेला
याबद्दल जावई राहुलने सांगितलं की त्याची सासू जीव देणार होती. ज्या दिवशी तो लग्नासाठी शेरवानी खरेदी करायला जाणार होता, त्याच दिवशी त्याच्या सासूने त्याला फोन केला आणि त्याला सांगितलं की जर तो आला नाही तर ती आत्महत्या करेल. मला जाणं भाग होतं. मग आम्ही अलिगड बस स्थानकावर भेटलो. तिथून आम्ही दोघेही बसने लखनौला गेलो. मग लखनौहून बिहारमधील मुझफ्फरपूरला गेलो. आम्ही मुझफ्फरपूरमधील एका हॉटेलमध्ये राहिलो, असं राहुलने सांगितलं. मी तिथे काम शोधत होतो, पण त्याच दरम्यान आम्हाला समजलं की पोलिस आमचा पाठलाग करत आहेत आणि इथे येत आहेत, म्हणून आम्ही दोघेही पोलिस स्टेशनमध्ये आलो आणि आत्मसमर्पण केले, अशा शब्दांत राहुलने सगळा घटनाक्रम सांगितला.
पती दारूडा, मी सोबत राहून काय करू
तर सासू अपना देवी यांनी सांगितले की, त्यांचा नवरा जितेंद्र दारूडा आहे. तो दारूच्या नशेत दररोज भांडत असे. तो मला खूप वाईट वागवायचा. तो घरखर्चासाठी 1500 रुपये देत असे आणि वारंवार त्याचा हिशोब मागत असे. आजपर्यंत मला एकही पक्क घर बांधता आलेलं नाही. शिवाय, मी जेव्हा जेव्हा माझ्या जावयाशी बोलायचो तेव्हा तो संशय घेत असे आणि मला त्याच्यासोबत पळून जाण्यास सांगायचा. अपना देवी यांनी त्यांची मुलगी शिवानीवरही गंभीर आरोप केले आणि , तीच मला जावयाशी बोलण्याबद्दल टोमणे मारायची असेही त्यांनी नमूद केलं.
सध्या, अपना देवी यांना वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. जेव्हा कुटुंबाने पाच तास समजावल्यानंतरही अपना देवी घरी जाण्यास तयार झाली नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम आहे.
