‘भारत काय करणार हे तुम्ही सांगू नका’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने ट्रम्प यांना सुनावलं
Shashi Tharoor vs Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणे सुमारे 40 टक्के कमी करणार असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांच्या या विधानावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाष्य केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले आहेत. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत रशियाकडून तेल खरेदी करणे सुमारे 40 टक्के कमी करणार असल्याचा दावा केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, भारताकडून सांगण्यात आले आहे की ते या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून होणारी तेल आयात 40 टक्के कमी करणार आहे. अचानक तेल खरेदी थांबवता येणार आहे. यासाठी एक प्रक्रिया आहे. हळू हळू भारत तेल खरेदी कमी करून ती शुन्यावर आणणार आहे.’ आता ट्रम्प यांच्या या विधानावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी भाष्य केले आहे.
भारताने काय करायचं ते सांगू नका…
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर भाष्य केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शशी थरूर म्हणाले की, ‘ट्रम्प यांनी भारताचे निर्णय जाहीर करू नये, हे मला खरोखर योग्य वाटत नाही. भारत स्वतःचे निर्णय जाहीर करेल. ट्रम्प काय करणार हे आम्ही जगाला सांगत नाही. त्यामुळे त्यांनीही भारत काय करणार हे जगाला सांगू नये’ असं थरूर यांनी म्हटलं आहे.
भारत सरकारनेही ट्रम्प यांना दिले उत्तर
व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदेत नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हे विधान केले होते. मात्र भारत सरकारने या विधानाचे खंडन केले होते. ‘आमच्या ऊर्जा धोरणाचे उद्दिष्ट देशातील ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आहे. स्थिर किंमत नियमित आणि सुरक्षित पुरवठा याला देशाचा पाठिंबा आहे. आम्ही देशाच्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन तेल खरेदी कोणत्या देशाकडून करायचे याचा निर्णय घेतला जातो’ असं भारताने म्हटलं आहे.
याआधीही केली होती विधाने
याआधीही ट्रम्प यांनी भारताबाबत अनेक विधाने केली होती. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष मी थांबवला होता असा दावाही ट्रम्प यांनी केला होता, मात्र हा दावाही भारताने फेटाळला होता. आताही ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला आहे. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर आरोप करताना म्हटले होते की, भारत रशियन तेल खरेदी करून रशियाला युक्रेनविरुद्धच्या युद्धात मदत करत आहे. याच कारणामुळे अमेरिकेने भारतावर 25 टक्के अतिरिक्त कर लादला होता.
