जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांच्या निधनाची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
सत्यपाल मलिक यांच्या ट्वीटरवरुन त्यांच्या निधनाची बातमी देण्यात आली. माजी राज्यपाल चौधरी सत्यपाल सिंह मलिक यांचे निधन, असे ट्वीट आज दुपारी १.२२ च्या दरम्यान करण्यात आले. यानंतर त्यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरली. सत्यपाल मलिक यांना मे महिन्यात मूत्रमार्गाच्या गंभीर संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
पूर्व गवर्नर चौधरी सत्यपाल सिंह मलिक जी नहीं रहें।#satyapalmalik
— Satyapal Malik (@SatyapalMalik6) August 5, 2025
७ जून रोजी त्यांनी स्वतःच आपल्या प्रकृतीची माहिती ट्वीट करून दिली होती. “नमस्कार मित्रांनो. मी गेल्या जवळपास एक महिन्यापासून रुग्णालयात असून किडनीच्या समस्येशी झुंजत आहे. माझी प्रकृती खूप गंभीर होत आहे. मी असेन किंवा नसेन, पण मला माझ्या देशवासियांना सत्य काय आहे ते सांगायचे आहे.” असे त्यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटले होते.
नमस्कार साथियों। मैं पिछले लगभग एक महीने के करीब से हस्पताल में भर्ती हूं और किड़नी की समस्या से जूझ रहा हूं। परसों सुबह से मैं ठीक था लेकिन आज फिर से मुझे ICU में शिफ्ट करना पड़ा। मेरी हालत बहुत गंभीर होती जा रही है। मैं रहूं या ना रहूं इसलिए अपने देशवासियों को सच्चाई बताना…
— Satyapal Malik (@SatyapalMalik6) June 7, 2025
राजकीय कारकीर्द
सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास फार मोठा आहे. त्यांनी अनेक राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले आहे. यात बिहार, जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. ऑगस्ट २०१८ ते ऑक्टोबर २०१९ या काळात ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. हा कार्यकाळ त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरला. त्यांच्याच कार्यकाळात ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द करण्यात आले. ज्यामुळे जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला होता. या ऐतिहासिक निर्णयाचे ते साक्षीदार होते. योगायोगाने आज या निर्णयाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावर असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांनी राज्यामध्ये चांगले नियंत्रण ठेवले होते. तसेच शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यावेळी आणि त्यानंतरच्या घडामोडींच्या वेळीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्यपाल मलिक हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. त्यांनी अनेकदा सरकारच्या धोरणांवरून थेट टीकाही केली होती.
