सौदीच्या 50 डिग्री तापमानातही काबामधील दगड थंड कसे? जाणून घ्या यामागचं सिक्रेट
सौदी अरेबियाच्या ५०° तापमानातही मक्का येथील काबामधील पांढरे दगड थंड राहतात हे कसं शक्य आहे? यामागे कोणतं तंत्रज्ञान आहे की निसर्गाचा चमत्कार? जगभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या या पवित्र ठिकाणच्या जमिनीवर लावलेल्या त्या खास पांढऱ्या दगडांचं 'थंड' रहस्य काय आहे? चला, उलगडूया

इस्लाम धर्माचं पवित्र स्थान असलेलं ‘काबा’ सौदी अरेबियातील मक्का शहरात आहे. जगभरातून लाखो मुस्लिम बांधव दरवर्षी हज यात्रेसाठी मक्का आणि मदिना येथे येतात. काबा आणि त्याच्या परिसरातील जमिनीवर लावलेल्या विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या दगडांबद्दल एक गोष्ट नेहमीच कुतूहलाचा विषय ठरते सौदी अरेबियाच्या कडक उन्हाळ्यात, जिथे तापमान अनेकदा ५० डिग्री सेल्सियसच्याही वर जातं, तिथेही हे दगड आश्चर्यकारकपणे थंड कसे राहतात? यामागे कोणती खास टेक्नॉलॉजी आहे की हा निसर्गाचा चमत्कार आहे?
थंडपणाचं रहस्य: ‘थासोस मार्बल’
अनेक मीडिया रिपोर्ट्स आणि माहितीनुसार, काबाच्या मशिदीच्या आवारात आणि मजल्यावर वापरण्यात आलेला पांढरा दगड हा काही सामान्य दगड नाही. हा खास प्रकारचा संगमरवर आहे, जो ग्रीसच्या ‘थासोस’ नावाच्या बेटावरून मागवला जातो. या ‘थासोस मार्बल’मध्ये काही नैसर्गिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे तो तीव्र उन्हातही थंड राहतो.
हे दगड थंड कसे राहतात?
सौदी अरेबियाच्या ५०° तापमानातही काबामधील दगड थंड राहण्याचं रहस्य म्हणजे ग्रीसमधील थासोस बेटावरून आणलेला खास ‘थासोस मार्बल’! या संगमरवराचा चमकदार पांढरा रंग सूर्यकिरणं परावर्तित करतो, तर त्याच्यातील सूक्ष्म छिद्रं रात्रीच्या गारव्यातून Moisture शोषून घेतात आणि दिवसा ती हळूहळू बाहेर टाकतात, अगदी माठातील पाण्याप्रमाणे पृष्ठभाग थंड ठेवतात. सोबतच, या ५ सेंटीमीटर जाड दगडाची भूमिकाही महत्त्वाची आहे, ज्यामुळे हा ‘बर्फाचा पांढरा मार्बल’ सौदीच्या कडक उन्हाळ्यातही एक सुखद अनुभव देतो.
‘स्नो व्हाईट मार्बल’
मक्का आणि मदिनामधील मशिदींमध्ये वापरला जाणारा हा पांढरा थासोस मार्बल त्याच्या खास गुणधर्मांमुळे आणि सुंदरतेमुळे ‘स्नो व्हाईट मार्बल’ म्हणूनही ओळखला जातो. अनेक दशकांपासून सौदी अरेबिया हा दगड खास करून ग्रीसमधून आयात करत आहे. हा दगड खूप महागडा असल्याचंही म्हटलं जातं. काही दाव्यांनुसार, प्रति चौरस फूट याची किंमत २५० ते ४०० अमेरिकन डॉलरच्या आसपास असू शकते.
अनेक ठिकाणी असा दावा केला जातो की या दगडांखाली थंड पाण्याची पाइपलाइन टाकलेली आहे, ज्यामुळे ते थंड राहतात. पण तज्ज्ञांच्या मते, यात फारसं तथ्य नाही. या दगडांचा थंडपणा हा त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळेच आहे.
