रेल्वेचा मोठा निर्णय : या प्रीमीयम ट्रेनमध्ये ब्रँडेड रेस्टॉरंटमधून येणार जेवण, प्रवाशांना दिलासा
भारतातील प्रीमियम ट्रेनमध्ये आता ब्रँडेड फूड कंपन्यांचे जेवण मिळण्यास सुरुवात होणार आहे. नवीन केटरिंग धोरणांतर्गत, रेल्वे प्रवाशांना स्वादिष्ट आणि सकस अन्न पुरवण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वे सर्वात किफायती आणि खात्रीशीर प्रवासाचे साधन आहे. रेल्वेतून दररोज अडीच कोटीहून अधिक लोकसंख्या प्रवास करत असते. जगात भारतीय रेल्वेचे जाळे चौथ्या क्रमांकावर आहे. आता भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता वंदेभारत आणि अमृत भारत एक्सप्रेससारख्या प्रिमियम ट्रेनमधील प्रवाशांना ब्रँडेड हल्दीराम, फ्लाईट कॅटरर्स आणि प्रसिद्ध रेस्टॉरंट साखळीचे ताजे, स्वादिष्ठ आणि सकस आहार मिळणार आहे.
भारतीय रेल्वेची कॅटरींगचे जेवण खाऊन कंटाळलेल्या प्रवाशांना आता ब्रँडेड फूड चेनमधील प्रसिद्ध रेस्टॉरंटचे जेवण मिळणार आहे. आता वंदेभारत आणि अमृत भारत एक्सप्रेस सारख्या प्रीमीयम ट्रेनमध्ये स्वादिष्ठ आणि रेस्टॉरंट क्वालिटीची जेवण आता मिळणार आहे. रेल्वेची खानपान व्यवस्था सांभाळणाऱ्या IRCTC ने हा निर्णय घेतला आहे.
या योजने अंतर्गत निवडक वंदेभारत आणि अमृत भारत ट्रेनमध्ये प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट (PoC)नावाने मील ट्रायल सुरु करण्यात आले आहे. ज्यात आता जेवण बनवणे आणि जेवण वाढणे अशा जबाबदाऱ्यांना वेगळे केले जात आहे. आता रेल्वे प्रवाशांचे जेवण मोठ्या ब्रँडेड इंडस्ट्रीअल किचन, रेस्टॉरंट चेन्स आणि फ्लाईट कॅटरर्स तयार करतील, तर ते जेवण वाढण्याचे काम स्वतंत्र यंत्रणा करणार आहे.
या ट्रेनपासून होणार सुरुवात –
| ट्रेन क्रमांक | ट्रेनचे नाव | कॅटरिंग पार्टनर |
|---|---|---|
| 20101/20102 | नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत | हल्दीराम ( नागपूर ) आणि Elior ( सिकंदराबाद ) |
| 14047/14048 | दिल्ली-सीतामढी अमृत भारत | टच स्टोन फाऊंडेशन ( दिल्ली ) |
| 20633/20634 | कासरगोड-तिरुवनंतपुरम | कॅसीनो एअर कॅटरर्स एण्ड फ्लाईट सर्व्हीसेस |
| 20631/20632 ( 16 डिसेंबर 2025 पासून ) | वंदे भारत मंगलुरु-तिरुवनंतपुरम - वंदे भारत | CAFS किचन |
| 26901/26902 | अहमदाबाद-वेरावल वंदे भारत | CAFS किचन ( गांधीनगर ) आणि सफल फूडीज (राजकोट) |
| 26401/02 आणि 26403/04 | श्री माता वैष्णो देवी कटरा-श्रीनगर वंदे भारत | वैष्णो देवी सरोवर पोर्टिको ( काटरा आणि श्रीनगर ) |
| 15567/15568 | बापूधाम मोतीहारी-आनंद विहार अमृत भारत | इस्कॉन, द्वारका (ISKCON Dwarka) |
काय असणार योजना ?
प्रत्येक प्रांतातील लोकल डिशेसचा मेन्यूत समावेश
जेवण एकदम ताजे आणि हायजेनिक पद्धतीने तयार होणार
फ्लाईट कॅटरिंगसारखा दर्जा असणार
प्लेट प्रेझेंटेशन आणि पॅकजिंग देखील रेस्टॉरंट दर्जाची असणार
रेल्वेच्या या निर्णयाची अमलबजावणी येत्या काळात शताब्दी, राजधानी आणि अन्य प्रीमीयम ट्रेनमध्ये होणार आहे. हल्दीराम, बिकानेर, फ्लाईट किचन तसेच अन्य रेस्टॉरंट साखळीतील जेवण मिळणार आहे.
