‘… तर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणार’, पाकच्या माजी विदेशमंत्र्याची धमकी
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावाचे वातावरण आहे. अशातच आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली आहे. भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असं झरदारी यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
हजरत शाह अब्दुल लतीफ भिट्टाई यांच्या 282 व्या उरूसाचा कार्यक्रम भित शाह येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रात भुट्टो यांनी हे विधान केले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतलेली आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबवलेला आहे, त्यामुळे पाकिस्तानातील शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमकी दिली जात आहे.
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान संतापला
भारताने दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना 7 मे रोजी पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करत 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र 10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धबंदीचा निर्णय घेतला होता.
भारतीय अधिकाऱ्यांनाही युद्धाची भीती .
काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही युद्धाची भीती व्यक्त केली होती. ‘ज्या युद्धाची भीती व्यक्त केली जात आहे ते लवकरच होऊ शकते आणि आपल्याला तयार राहावे लागेल असं द्विवेदी यांनी म्हटलं होतं. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान, सशस्त्र दलांना पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आले होते, त्यामुळे ऑपरेशन यशस्वी झाले असंही द्विवेदी यांनी म्हटलं होतं.
ऑपरेशन सिंदूरने देशाला एकत्र केले
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी असंही म्हटलं होतं की, ‘पहलगाममध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता, त्याच्या दुसऱ्याच दिवशीउच्च लष्करी आणि राजकीय नेतृत्वाची एक महत्त्वाची बैठक झाली होती. यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी “बस झाले आता.” असं म्हटलं होतं. ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण देशाला एकत्र केले. या नावाने संपूर्ण देशात नवीन उर्जेा संचारली होती.’
