INDIA आघाडीत मोठी फूट? ममता बॅनर्जी मांडणार वेगळी चूल? राहुल गांधींना देणार चेकमेट
INDIA Mamta Banerjee- Rahul Gandhi : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठे मतभेद समोर आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने झटका दिल्यानंतर आता ममता बॅनर्जी अनेक आघाड्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. INDIA आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधींना चेकमेट देण्याच्या त्या तयारीत आहेत.

2029 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजकारणात बड्या घडामोडींची नांदी समोर येत आहे. विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना चेकमेट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ममता बॅनर्जी वेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे. ममता दीदी अनेक आघाड्यांवर लढण्याच्या तयारीत आहे. भाजप, निवडणूक आयोग आणि आता काँग्रेससोबतही त्या उघड भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. द्रमुकच्या खासदार कनिमोळी कोलकत्त्यात बॅनर्जी यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. दोन्ही बड्या महिला नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यामध्ये काँग्रेसला बाजूला करत प्रादेशिक पक्षांची वेगळी मोट बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. बॅनर्जी, कनिमोळी या तिसऱ्या आघाडीची घोषणा करू शकतात.
काँग्रेसविरोधात मित्र पक्षांची भेट
कनिमोळी आणि बॅनर्जी यांची गुरुवारी कोलकात्ता येथे भेट झाली. कालीघाट येथील निवासस्थानी ही बैठक झाली. यापूर्वी कनिमोळी यांनी यापूर्वी मुंबईत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्या लवकरच आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसला वगळून एक मजबूत फळी उभारण्यासाठी द्रमूक आणि टीडीपीने चाचपणी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
तिसऱ्या मोर्चात काँग्रेसला स्थान नाही
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डीएमकेच्या एका नेत्याने मोठी प्रतिक्रिया दिली. त्यानुसार काँग्रेसला वगळून ते तिसऱ्या आघाडीची स्थापना करण्यासाठी चाचपणी करत आहेत. ममता बॅनर्जी यांचे डीएमके प्रमुख एम के स्टॅलिन यांच्याशी चांगले संबंध आहे. एनडीएविरोधी पक्षांची एकजूट, मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ज्यांना काँग्रेस नको आहे, अशा सगळ्यांची मिळून तिसरी आघाडी तयार करण्यात येत असल्याचे या नेत्याने सांगितले. यामुळे येत्या काही दिवसात काँग्रेसवगळून अजून एखादी आघाडी समोर येते का? हा चर्चेचा विषय ठरला आहे.
अद्याप मौन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
तृणमूल आणि डीएमके यांनी अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. दोन्ही महिला नेत्यांमध्ये केवळ सदिच्छा भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. काँग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीवर दोन्ही नेत्यांनी अद्याप मौन बाळगले आहे. राजकीय वर्तुळात मात्र तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा रंगली आहे. 2029 पूर्वी भाजपविरोधात विरोधकांमधील फूट ही कुणाच्या पथ्यावर पडणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे बडे नेते या घडामोडींवर तोडगा काढतील का? याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
