Aadampur Airbase Explain : भारताचा हवाई बुरूज; पाकला दिले चेकमेट, आदमपूर एअरबेसचे सामरिक महत्त्व माहिती आहे का?
Strategic Importance of Adampur Airbase : गेल्या दोन दिवसांपासून आदमपूर एअरबेस सारखा चर्चेत आहे. खोटी माहिती दिल्यानंतर मंगळवारी पंतप्रधानांनी आदमपूर विमानतळावरून पाकड्यांना सज्जड दम दिला. तुम्हाला या एअरबेसचे सामरिक महत्त्व माहिती आहे का?

ऑपरेशन सिंदूरने आदमपूर हवाई तळावरूनच भरारी घेतली आणि पाकिस्तानला तीन दिवस धडकी भरली. पाकड्यांचे कंबरडे मोडले. हा एअरबेस उद्ध्वस्त केल्याचा खोटा प्रचार पाकड्यांनी केला होता. त्यामुळे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर येथे जाऊन पाकला सज्जड दम भरला. भारताविरोधात आगळीक केली तर घरात घुसून मारू आणि यावेळी संधी पण देणार नाही असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.आदमपूरला भारताच्या हवाई सुरक्षेचा बुरूज म्हटल्या जाते. तुम्हाला या एअरबेसचे सामरिक महत्त्व माहिती आहे का?
भारतीय हवाई सुरक्षेचा बुरूज
भारताच्या पश्चिम सीमेवर पाकिस्तानवर डोळे वटारून पाहणारा आदमपूर एअरबेस, पाकच्या डोळ्यात सातत्याने खुपतोय. या हवाई तळावरून भारताने पाकिस्तानला यापूर्वीच्या युद्धात पाणी पाजले आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील आदमपूर या ठिकाणी असलेल्या या हवाई तळाचे सामरिक महत्त्व आहे. भारतीय हवाईल दल आणि सुरक्षेच्या दृष्टीने अंबाला हा भारताचा सर्वात प्रमुख हवाई तळ आहे. तर दुसर्या क्रमांकावर आदमपूर एअरबेस आहे.




सामारिक आणि भौगोलिक महत्त्व
आदमपूर एअरबेस हा पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 100 किमीवर आहे. पाकिस्तानसोबत तणाव झाल्यास तातडीने येथून हवाई हल्ले चढवता येतात. येथून तात्काळ लष्करासाठी प्रतिसाद देण्यात येतो. दिल्लीपासून पण हा तळ जवळ आहे. हा तळ म्हणजे अंबालानंतर भारतीय अवकाशाची एक भक्कम संरक्षण भिंत आहे.
लढाऊ विमानांचा गड
आदमपूर हा भारतीय लढाऊ विमानांचा गड मानल्या जातो. या एअरबेसवर मिग-29 (MiG-29) आणि सुखोई-30 एमकेआय (Su-30MKI) सारखी अत्याधुनिक लढाऊ विमाने आहेत. शत्रूच्या विमानांना याच एअरबेसवरून दणका देण्यात आला होता. याठिकाणी आता भारताने रशियन बनावटीची S-400 ही एअर डिफेन्स सिस्टिम उभी केली आहे. ही संरक्षण प्रणाली 400 किमी पर्यंतच्या क्षेपणास्त्र, विमाने आणि ड्रोनना नष्ट करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.
आदमपूर येथील हवाईतळावर दोन धावपट्ट्या (Runways) आहेत. पूर्णतः सुसज्ज हँगर्स, तांत्रिक यंत्रणा, सिम्युलेटर रूम्सची येथे व्यवस्था आहे. हा लढाऊ विमानांचा गड आहे. यापूर्वीच्या 1965 आणि 1971 च्या युद्धात पाकिस्तानने सर्वात अगोदर येथे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. आता ऑपरेशन सिंदूर येथूनच राबवण्यात आले. त्यामुळेच हे तळ उद्ध्वस्त केल्याचा कांगावा पाकिस्तान करत होता. त्याला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तळावर जाऊन चोख उत्तर दिले. हवाई दलाच्या कर्मचार्यांसाठी निवासी व शैक्षणिक व्यवस्था करण्यात आली आहे.