पाकिस्तानचे दोन तुकडे करा, PoK ला भारतात…रेवंत रेड्डीची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी
Revanth Reddy on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे जनक्षोभ उसळला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याची मागणी केली आहे.

पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्याविरोधात शुक्रवारी हैदराबादमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्याला त्यांनी पाठिंबा दिला. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना करारा जबाब देण्याचे आवाहन केले.
मोठी कारवाई करा. पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या असे रेड्डी म्हणाले. पहलगाम सारख्या घटना थांबवण्यासाठी केंद्र सरकारने निर्णायक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 1971 मध्ये बांग्लादेश निर्मिती केल्यानंतर इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा म्हणून केली होती, याची त्यांनी आठवण करून दिली.
पाकिस्तानचे दोन तुकडे करा
पाकिस्तानचे दोन तुकडे करा. पीओकेचा भारतात समावेश करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी जाहीर केले. तुम्ही दुर्गा मातेचे भक्त आहात. इंदिरा गांधी यांना आठवा आणि पाकिस्तानविरोधात कारवाई करा, असे आवाहन रेड्डी यांनी केले. पाकिस्तानविरोधात कडक पावलं टाका असे आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. आता कोणतीही चर्चा, करार करण्याची वेळ नाही. त्यांना जशाच तसे उत्तर द्या अशी मागणी मुख्यमंत्री रेड्डी यांनी केली होती.
జమ్ము కాశ్మీర్ లోని పహెల్గామ్ లో … ఉగ్రవాదుల దుశ్చర్యలో ప్రాణాలు పోగొట్టుకున్న అమరుల ఆత్మలకు శాంతి చేకూరాలని… రాజకీయాలకు అతీతంగా… పీపుల్స్ ప్లాజా నుండి ఇందిరాగాంధీ విగ్రహం వరకు కొవ్వొత్తుల ర్యాలీ నిర్వహించడం జరిగింది.
ఉగ్రవాద దుశ్చర్యకు వ్యతిరేకంగా… ముష్కరులను… pic.twitter.com/olR8FCXgRj
— Revanth Reddy (@revanth_anumula) April 25, 2025
असदुद्दीन ओवैसी यांचे पीएम मोदींना समर्थन
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याविषयीच्या वक्तव्याचे स्वागत आणि समर्थन केले. राष्ट्रहितासाठी आमचा पक्ष सरकारच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी या हल्ल्याची जबाबदारी निश्चित करा आणि दहशतवाद्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी ओवैसी यांनी केली. देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे आवाहन ओवैसी यांनी केले. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे 26 निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.
