फक्त 1 मिनिटं अन् जमिनीत घर गाडलं गेलं, फक्त छत दिसत होतं, शिट्ट्या वाजवून वाजवून आमचा जीव गेला आणि… उत्तरकाशीत नेमकं काय घडलं?
Uttarkashi CloudBurst आता सर्वकाही संपलं आहे..., फक्त 1 मिनिटं अन् होत्याचं नव्हतं झालं... शिट्ट्या वाजवून वाजवून आमचा जीव गेला आणि... उत्तरकाशीत नेमकं काय घडलं?

आता सर्वकाही संपलं आहे… उत्तरकाशीतील धारली गावात ढगफुटीमुळे झालेलं नुकसान पाहणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचे हे शब्द आहेत. मंगळवारी धारलीमध्ये झालेल्या विध्वंसानंतर, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये लोकांचं रडणं, ओरडणं स्पष्टपणे ऐकू येत आहे. व्हिडीओ पाहून प्रचंड वाईट वाटत आहे. व्हिडीओमध्ये संकट डोळ्यासमोर असताना लोकं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या घटनेने 2013 च्या केदारनाथ दुर्घटनेच्या ताज्या जखमा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.
धारलीजवळील मुखाबा गावातील लोकांनी जेव्हा हे भयानक दृश्य पाहिले तेव्हा त्यांच्याही अंगावर काटा आला. मुखाबा गावातील स्थानिक रहिवासी आणि या घटनेचे प्रत्यक्षदर्शी 60 वर्षीय सुभाष चंद्र सेमवाल म्हणतात की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही इतकं भयानक दृश्य पाहिलं नव्हतं.
सुभाष चंद्र सेमवाल म्हणाले, दुपारची वेळ होती. वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकू आला. दगड वेगाने खाली येत होते. त्यानंतर सुभाष आणि त्याचे कुटुंबातील इतर लोक बाहेर आले. आम्हाला दिसले की खीर गंगा नदीचे पाणी वेगाने खाली येत होते. आम्ही सर्व घाबरलेलो… आम्ही परिसरातील इतर लोकांना सतर्क करण्याचा निर्णय घेतला. सर्वांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितलं… बराच काळ आम्ही ओरडत होतो, शिट्ट्या वाजवत होतो…

भावूक होत सेमवाल म्हणाले, ‘माझा आवाज ऐकल्यांमुळे अनेक हॉटेलमधून लोकं बाहेर आले. पण पाण्याच्या प्रवाहात ते देखील वाहून गेले. ‘त्याच घटनेच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, लोक घाबरून पळून जात आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलावताना दिसत आहेत. अनेक व्हिडीओमध्ये लोकं म्हणत आहेत की, आता सर्व काही संपले आहे.
सांगायचं झालं तर, गंगोत्रीला जाण्यासाठी धाराली हे मुख्य थांबा आहे. येथे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि होमस्टे आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयएसबीटीच्या टीम बचाव कार्यात गुंतल्या आहेत. लष्कराचा हर्षिल कॅम्प देखील घटनास्थळापासून फक्त चार किलोमीटर अंतरावर आहे. सोशल मीडियावर लष्कराने अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सर्वत्र विध्वंस दिसत आहे. लोकांना आपत्तीग्रस्त धारालीपासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, एसडीआरएफशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 50 सैनिकांची टीम मदत आणि बचाव कार्यासाठी दाखल झाली आहे.

एनडीआरएफची चार पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, राज्य आणि केंद्र सरकारने लोकांना नदीपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
