मोठी बातमी! उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर, मतदान कधी होणार?
भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. ज्या दिवशी निवडणकू होणार त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. vice president election schedule declared by election commission of india

Vice President Election : जगदीप धनखड यांनी काही दिवसांपूर्वी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली आहे.
9 सप्टेंबर रोजी होणार मतदान
मिळालेल्या माहितीनुसार येत्या 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याच दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठीी 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे आता देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
निवडणूक कार्यक्रम काय? मतदान कधी होणार?
भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 9 सप्टेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येतील. 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज वापस घेता येणार आहे. 9 स्पटेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होईल आणि याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
Election Commission of India announces schedule for the election of Vice President of India
Last date for nominations-August 21, 2025 Date of poll (if necessary)- September 9, 2025 pic.twitter.com/Ct6u3A9KpR
— ANI (@ANI) August 1, 2025
जगदीप धनखड यांचा राजीनामा, मोदींचे मानले होते आभार
जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी रात्री आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. हा निर्णय घेताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले होते. प्रकृतीच्या कारणास्तव मी हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले होते. धनखड यांच्या या निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
धनखड यांच्यानंतर उपराष्ट्रपती कोण होणार?
दरम्यान, जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार असे विचारले जात आहे. या पदासाठी योग्य चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच बिहारच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपा यावेळी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार या राज्यातून देणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बिहारमधील भाजपाच्या एका आमदाराने नितीश कुमार यांना उपराष्ट्रपती केलं तर आम्हाला आनंदच होईल, अशी भावना व्यक्त केली होती. तसेच केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भेट घेतली होती. त्यामुळे ठाकूर हेदेखील उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आहेत का? त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
