देशात आता लोकसभा निवडणूक घेतल्यास कोणाची सत्ता? भाजप की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर
इंडिया टुडे ग्रुप आणि CVoter चा मोदी ऑफ द नेशन (MOTN) चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

इंडिया टुडे ग्रुप आणि CVoter चा मोदी ऑफ द नेशन (MOTN) चा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये पुन्हा एकदा मतदारांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. समजा आज जर लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येऊ शकते असं या सर्व्हेमधून समोर आलं आहे. या सर्व्हेनुसार आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला देशात 281 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला केवळ 78 जागांवर समाधान मानावं लागेल. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 99 जागा मिळाल्या होत्या, मात्र आता सध्या तरी त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. तर इतर पक्षांना 184 जागा मिळण्याची शक्यता आहे.
या सर्व्हेनुसार जर आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपला 40.7 टक्के एवढं मतदान होऊ शकतं.तर काँग्रेसला 20.5 टक्के एवढं मतदान होण्याची शक्यता आहे, म्हणजे भाजपला काँग्रेसच्या तुलनेत जवळपास दुप्पटच मतदान होण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 38.5 टक्के एवढं मतदान होऊ शकतं. जर आज निवडणुका झाल्या तर एनडीएला 343 जागा मिळण्याची शक्यता आहे तर इंडिया आघाडीला 188 जागा मिळू शकतात. बारा जागांवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
2 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान सर्व्हे
इंडिया टुडे ग्रुप आणि CVoter च्या वतीनं हा सर्व्हे करण्यात आला. हा सर्व्हे 2 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आला. या सर्व्हे दरम्यान सर्वे 543 लोकसभा मतदारसंघातील 54,418 लोकांचं मत जाणून घेण्यात आलं. या व्यतिरिक्त सी- व्होटरनं गेल्या 24 आठवड्यामध्ये तब्बल 70,705 लोकांचं मत जाणून घेतलं. त्यानंतर हा सर्व्हे करण्यात आला. या सर्वेमधून पुन्हा एकदा देशात लोकसभा निवडणूक झाली तर भाजप सत्तेत येऊ शकतं असं दिसून आलं.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात एनडीएची सत्ता तर आली, मात्र भाजपला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही, भाजपच्या जागांमध्ये घट झाली. मात्र या सर्व्हेमधून आता असं दिसून येत आहे की, जर पुन्हा लोकसभा निवडणूक झाली तर भाजपच्या जागा वाढू शकतात.