आजही मुख्यमंत्री असल्यासारखं फडणवीसांना का वाटतं?; विधानामागचा राजकीय अर्थ काय?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. (why devendra fadnavis said, Never felt I am no longer chief minister?)

आजही मुख्यमंत्री असल्यासारखं फडणवीसांना का वाटतं?; विधानामागचा राजकीय अर्थ काय?
devendra fadnavis


मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. फडणवीस यांच्या या विधानाचा राजकीय अर्थही काढला जात आहे. फडणवीसांनी आताच हे विधान का केलं? असा सवाल केला जात असून तर्कवितर्कही लढवले जात आहेत.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, नवी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं होतं. तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्याने मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे. मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही. तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं, असं फडणवीस म्हणाले.

गर्दी पाहून केलेलं विधानं

ही विधानं समोरची गर्दी पाहून केलेली असतात. गर्दीचा रिस्पॉन्स पाहून केलेली असतात. त्याकडे फार गांभीर्याने पाहू नये. पण अशी विधाने करताना नेत्यांनी गांभीर्य ठेवलं पाहिजे. कारण त्यातून ते ट्रोल होऊ शकतात. सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाऊ शकते. सोशल मीडियाच्या काळजीपूर्वक विधाने करायला हवीतच. त्यामुळे नेत्यांनी सजग राहिलं पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा नेता असो, त्यांनी अशी विधानं टाळली पाहिजे. चौकटीतल्या बातम्यांची हेडलाईन होण्याचा हा काळ आहे. समोरचा प्रतिसाद बघून केलेली ही वक्तव्य आहेत. पण जाहीरपणे अशी विधाने केल्याने त्याचं हसं होतं, असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी सांगितलं.

सत्तांतराचे संकेत नाहीत

सत्ता नसल्याचं भाजपला फ्रस्टेशन आहेच. त्यातूनही अशी विधाने येतच असतात. आता कालचंच उदाहरण घ्या. काल बंदच्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एवढी आदळआपट करण्याची भाजप नेत्यांना गरज नव्हती. एवढ्या गंभीर विषयावर एखादी प्रतिक्रिया देऊन विरोध करणं ठिक आहे. पण त्यांनी जी आदळआपट केली ती काही योग्य नव्हतं, असं सांगतानाच यातून सत्तांतराचे वगैरे काहीच संकेत नाहीत. केवळ टाळ्या खाण्यासाठीची ही विधाने आहेत, असंही विजय चोरमारे यांनी सांगितलं.

म्हणून फडणवीस बोलले

फडणवीस यांच्या विधानाचा काहीच राजकीय अर्थ काढता येत नाही. मीच केवळ जनतेच्या संकटात धावून जातो. मुख्यमंत्री फिरकतही नाही. जे काम मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे ते मला करावं लागतं हे बिंबवण्यामागचा फडणवीसांचा हेतू आहे. मी तुमच्यासोबत मुख्यमंत्री असल्यासारखाच दिवसभर फिरतो. खरे मुख्यमंत्री घरातच बसले आहेत, असंही त्यांना सूचवायचं होतं. मुख्यमंत्री माझ्यासारखाच असावा तो फिरणारा असावा असंही त्यांना बिंबवायचं होतं. त्यातूनच फडणवीसांनी हे विधान केलं असावं, असं ‘नवभारत टाइम्स’ ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभिमन्यू शितोळे यांनी सांगितलं.

फडणवीसांना बोलावं लागतं ही शोकांतिका

मी मुख्यमंत्री आहे असं त्यांना वाटतं हा गंमतीचा भाग आहे. लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे हेही त्यांना दाखवून द्यायचं आहेच. पण आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहोत हे लोकांच्या मनात बिंबवायला त्यांना स्वत: बोलावं लागतं ही शोकांतिका आहे, असंही अभिमन्यू शितोळे यांचं म्हणणं आहे.

संबधित बातम्या:

VIDEO: मला असं वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही, देवेंद्र फडणवीस यांची ‘मन की बात’

मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका, विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं; नवाब मलिकांचा फडणवीसांना चिमटा

फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात, आनंद आहे!

(why devendra fadnavis said, Never felt I am no longer chief minister?)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI