भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला, अशोक चव्हाणांचा घणाघात

काँग्रेसला रामराम करत भाजपचं कमळ हाती घेणाऱ्या अमरीश पटेल यांचा विजय काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

  • सुनिल काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:47 PM, 3 Dec 2020

मुंबई : काँग्रेसला रामराम करत भाजपचं कमळ हाती घेणाऱ्या अमरीश पटेल यांचा विजय काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. पटेल यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये सहभागी झालेल्या अमरीश पटेल यांच्यामुळे झालेल्या फुटीवरही भाष्य केलं (Ashok Chavan criticize BJP over victory of Amrish Patel).

अशोक चव्हाण म्हणाले, “भाजपने मिळवलेला विजय हा दुसर्‍याच्या घरात चोरी करून मिळवलेला विजय आहे. दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे. भाजपने ही चोरी केली आहे. आम्हाला 5 जागांपैकी अनेक जागा मिळतील. तसेच आमचं आघाडीचं सरकार देखील पाच वर्षे हे सरकार टिकेल.”

धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJPs Amrish Patel political journey) यांनी आपला दबदबा सिद्ध केला. अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांना 332 तर विरोधी उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. त्यामुळे अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील हा सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.

‘अमरीश पटेल सोडून गेल्याने फुटलेल्या मतांचा आकडा मोठा’

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणुकीत अमरीश पटेल यांच्या काँग्रेस सोडल्याने झालेल्या नुकसानाची कबुली दिली. ते म्हणाले, “धुळ्यात अमरीश पटेल यांचे संबंध लोकांशी चांगले होते. ते पूर्वी काँग्रेसमध्येच होते. अमरीश पटेल सोडून गेल्याने त्यांच्याबरोबर काही लोक गेले होते. त्यामुळे मतं फुटलेला आकडा मोठा वाटतोय. नागपूर, पुणे, औरंगाबाद, अमरावतीचा निकाल यायचे आहेत. तिथे महाविकास आघाडीचे चांगले निकाल येतील.”

यावेळी थोरात यांनी वनकर यांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केलं. “आमची इच्छूकांची संख्या 300 पेक्षा अधिक होती. त्यातून 4 जणांची नावं निवडायची होती. त्यामुळे थोडीफार नाराजी असणार होती. ती नाराजी काँग्रेसमध्ये बोलून दाखवली जाते,” असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

“एच. के. पाटील यांनी मागासवर्गीय विभागाशी संवाद साधला. आज विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. यात आम्ही दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आहे,” असंही थोरात यांनी सांगितलं. एच. के. पाटील यांनी यावेळी केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी असल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या : 

MLC election Maharashtra 2020 result | अमरावती शिक्षक मतदारसंघ, पहिल्या फेरीत भाजपचे नितीन धांडे यांना जबर धक्का

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

Ashok Chavan criticize BJP over victory of Amrish Patel